बीड : रेमडिसीविर इंजेक्शनचा बीडमध्ये सर्रास काळाबाजार होत असून या इंजेक्शनचा वापर विशिष्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते स्वतःच्या कार्यालयातून करत असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांना दिलेल्या पत्रात केला आहे.
विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नावावर हे इंजेक्शन प्रशासनाकडून ताब्यात घेतले जात आहे. या वेळी चुकीच्या पद्धतीने डॉक्टरांच्या सह्या इंजेक्शनच्या मागणीसाठी घेतल्या जात आहेत असे सुद्धा पंकजा मुंडे याने पत्रामध्ये म्हटले आहे.
डॉक्टर दहशतीखाली काम करत असल्यामुळे ते यावर बोलू शकत नाही मात्र मी यावर आवाज उठवणार आहे. कोरोनाची लस असो की रेमडिसीविर इंजेक्शन हे कोणाचीही मक्तेदारी नाही त्यामुळे कुणीतरी आपल्या पक्षाच्या कार्यालयातून ते वाटणे चुकीचा असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, लगेच लॉकडाऊन उठवला जाणार नसून कोरोनावर पूर्णपणे मात करण्याच्या प्रयत्नात लॉकडाऊन वाढण्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आणि उदय सामंत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आता लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत आहे, असे संकेत दिले आहेत. गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लावले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यानंतर 22 एप्रिलपासून पुढील 15 दिवस लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली पण तिसरी लाट येण्याआधी सरकारला राज्यात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत.
ज्यामध्ये सर्वात प्रथम लसीकरण, आयसीयू बेड्सची संख्या, जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठ्याचा समावेश आहे. त्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं मत महाविकास आघाडीतले नेते करत आहेत. कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही याची प्राथमिक चर्चा केली जाईल. यामध्ये शहरनिहाय कोरोनाग्रस्तांची आकडेवारी समोर मांडली जाईल, लॅाकडाऊनचा किती परिणाम सध्या होतोय आणि वाढवला तर किती परिणाम होईल यावर सगळं अवलंबून आहे.