मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱ्या रस्ते घोटाळ्यात पंकजा यांचं नाव समोर आलं आहे. चिक्की घोटाळ्याचं वादळ शांत होत नाही तोच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंवर आणखी एक आरोप होत आहे. मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यात अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडेंचाही सहभाग असल्याचं वृत्त आहे. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रानं यासंदर्भात बातमी दिली आहे.


 
रस्ते घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरपीएस कन्स्ट्रक्शन्स या कंपनीसोबत पंकजा मुंडेच्या कंपनीची भागीदारी असल्याची माहिती आहे. जून 2012 मध्ये पंकजा यांच्या सुप्रा मीडिया कंपनीसोबत आरपीएस कंपनीनं भागीदारी केली. मुंडेंच्या कंपनीशी भागीदारी केल्यानंतर आरपीएस कंपनीला तब्बल 1398 कोटींच्या कामांची कंत्राटं मिळाली.

 
ऑगस्ट 2015 मध्ये भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या तक्रारीनंतर रस्ते घोटाळ्याचा तपास करण्यात आला होता. रस्ते घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं 6 कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल केला आणि तात्काळ 30 मे 2016 रोजी पंकजा मुंडेंनी सुप्रा कंपनीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

 
17 जूनला पोलिसांनी रस्ते घोटाळ्याप्रकरणी 10 जणांना अटक केली आणि पंकजा मुंडेंचे पती चारुदत्त पालवेंनीही भागीदारी संपुष्टात आणली. 'माझे पती अॅडव्हर्टायझिंगमध्ये काम करतात. 2012 मध्ये त्यांनी संबंधित कंपनीशी टायअप केलं. मात्र 4 वर्षात कंपनीशी कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं नाही. म्हणून आम्ही भागीदारी तोडली. 2012 मध्ये तर मी मंत्रिपदावरही नव्हते, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.

 
राष्ट्रवादीनं मात्र हे संपूर्ण लाचलुचपत विभागाकडे देऊन कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या भ्रष्ट मंत्र्याना क्लीन चिट देता देता मुख्यमंत्र्यांची विधानसभेत दमछाक होत आहे, पण दुसरीकडे भाजप नेत्यांवरील आरोपांची मालिका थांबताना दिसत नाही. रस्ते घोटाळा आम्हीच उघडकीस आणला असं भाजपचे नेते ठासून सांगत आहेत. त्यातच पंकजा मुंडेंचं नाव रस्ते घोटाळ्यात आल्यानंतर मुख्यमंत्री चौकशीचे आदेश देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.