पालघरमध्ये दोन तरुणांच्या आत्महत्येने खळबळ
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 28 Jun 2019 04:43 PM (IST)
दोन तरुणांनी वेगवेगळ्या कारणास्तव एकाच दिवशी विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे
पालघर : पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील सारसी येथील विशाल ज्ञानेश्वर ठाकरे (वय 26 वर्ष) आणि कोने येथील धीरज नरेश अधिकारी(वय 22 वर्ष) या दोन तरुणांनी वेगवेगळ्या कारणास्तव एकाच दिवशी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वाडा तालुक्यातील सारसी येथील विशाल ठाकरे हा विवाहित तरुण असून दीड महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता. विशालने आजारपणाला कंटाळून आणि मानसिक तणावाखाली सकाळच्या सुमारास विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. तर कोने येथील धीरज अधिकारी या तरुणानेही विष प्राशन करुन आत्महत्या केली. धीरजच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. तरुणांच्या अशा वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे पालकवर्ग चिंताग्रस्त असून तालुक्यात या आत्महत्यांचीच चर्चा सुरु आहेत.