मुंबई : अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडली. अंमली पदार्थांच्या व्यसनांमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. काही ठरावीक देशांमधून येऊन इथे येऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना आपल्या देशात येण्यास बंदी घाला, अशी मागणीदेखील पवार यांनी केली आहे. या विषयावर अजित पवार यांच्यासह इतरांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या दरम्यान पवार यांनी विविध मागण्या मांडल्या.
राज्यात तरुणांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता हा गंभीर विषय असून गेल्या वर्षी राज्यात 1000 कोटींपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज पकडण्यात आल्याचा मुद्दा अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. व्यसनांमुळे तरुण पिढी बरबाद होत असून घरातील पालक नोकरी करत असल्याने मुलांकडे लक्ष द्यायला कोणीही नसतं, हा मुद्दा उपस्थित करत ड्रग्जवर आळा घालण्याकरता कठोर तरतुदी केल्या पाहिजेत, अशी मागणी पवार यांनी केली. तसेच यासाठी राज्य सरकारने अधिकचा निधी द्यायला हवे, असेही त्यांनी सुचवले.
दरम्यान, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी व्यसनाधीतेचे प्रमाण वाढत असल्याचे मान्य करत जिथे 2 वर्षांची शिक्षा आहे तिथे 10 वर्ष इतकी शिक्षा वाढवण्यात आली असून काही गुन्ह्यांसाठी असेलली 10 वर्षांची शिक्षा 20 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
काही महाविद्यालंयांमध्ये किंवा आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री होते, तिथे साध्या गणवेशातील पोलीस नेमले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. असे प्रकार रोखण्यासाठी विशेष पोलिसांची पथके नेमण्यासंदर्भात पोलीस महासंचालकांना पत्र लिहिण्यात आले असून अशी विक्री करणारी दुकाने, पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा : अजित पवारांची विधानसभेत मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jun 2019 02:50 PM (IST)
अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -