पालघर : पालघरमध्ये मायलेकीची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.


पालघर तालुक्यातील पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या छाया निवास येथे एका सदनिकेत दोन महिलांचे मृतदेह आढळून आले होते. या प्रकरणातील आरोपीने दोन महिलांची हत्या करुन उत्तर प्रदेशात पळ काढला होता. त्यानंतर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर इथून ताब्यात घेतले आहे. आरोपीला बोईसरमध्ये आणले जात असून त्यानंतर या खुनाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


तारापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पास्थळ येथील छाया निवास रहिवासी संकुलात लक्ष्मी रवींद्र पवार (वय 50 वर्ष) आणि सोनाली रवींद्र पवार (वय 30 वर्ष) या दोघी राहत होती. 11 डिसेंबर रोजी या दोघींचे मृतदेह बंद घरात कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजनुसार 6 डिसेंबर रोजी घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यानुसार मयत महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केला जात होता.


तपासादरम्यान पोलिसांना काही कागदपत्रे मिळाल्यानंतर मयत महिलेचा पती खोटी कागदपत्रे बनवून याठिकाणी वावरत असल्याचे समोर आले. आपले आडनाव पवार सांगत असलेला इसम मूळचा यूपीचा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यातच मयत महिलेच्या मुलाकडून मिळालेली माहिती, याचा तपास केल्यानंतर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेची टीम मिर्झापूर येथे आरोपीच्या शोधत पोहोचली.


गुन्हे शाखेच्या टीमने मिर्झापूर येथून आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला बोईसर येथे आणण्यात येत आहे. त्यानंतर नेमके खुनाचे कारण काय अशा अनेक गोष्टींचा उलघडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.