राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूक 2018 चा निकाल जाहीर झाला. भाजपचे राजेंद्र गावित यांनी या निवडणुकीत जवळपास 30 हजार मतांनी विजय मिळवला. राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला. निवडणूक आयोग आता याबाबतची औपचारिक घोषणा करणं बाकी आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी अर्धी झाल्यानंतर श्रीनिवास वनगा थेट शेतात काम करण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी पालघर पोटनिवडणुकीतील पराभवावर भाष्य केलं.
पालघरमध्ये शिवसेनेला धक्का, श्रीनिवास वनगा हरले!
चुका सुधारणार
यावेळी श्रीनिवास वनगा म्हणाले की, निवडणुकीत भरघोस मत देणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानतो. ही निवडणूक शिवसेना पहिल्यांदा लढली. कमी वेळेत मोठी यंत्रणा उभारण्यासाठी कसरत करावी लागली. गावोगावी फिरलो, चांगले-वाईट अनुभव आले. ज्या चुका झाल्या, त्या सुधारणार. उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्या प्रचारासाठी ताकदीनिशी उतरणार. 2019 ची लोकसभा निवडणूक आम्ही नक्कीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपने बाबांचा फोटो वापरुन मतं मागितली
शिवसेना कुठे कमी पडली याबाबत विचारलं असता वनगांनी सांगितलं की, "आमचे कार्यकर्ते होते, पण काही भागात शिवसेनेचं चिन्हदेखील मतदारांना माहित नव्हतं. भाजपने माझ्या बाबांचा फोटो वापरुन मतं मागितली. वनगा म्हणजे कमळ हेच मतदारांना माहित होतं. त्याचा फायदा भाजपने घेतला. त्यामुळे बऱ्याच लोकांनी कमळाला मत दिलं असेल. आज थोडं दु:ख वाटतंय की बाबांच्या कार्याला गती मिळण्यासाठी थोडा उशीर होईल."
LIVE पालघर निकाल: भाजपचे राजेंद्र गावित विजयी
आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली!
"मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड,भेद याचा नक्कीच वापर केला. प्रचारादरम्यान मला त्याचा अनुभवही आला. त्यांनी पैसे वाटले. आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली. दहशतीखाली येऊन जनता घाबरली असावी, त्यामुळेच त्यांना मतं दिली असावीत. परंतु येणाऱ्या निवडणुकीत जनता सावरेल, ह्याबद्दल विचार करेल. महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, हे जनतेच्या लक्षात येईल," असंही वनगा यांनी नमूद केलं.
ईव्हीएमबद्दल शंका
"ईव्हीएमबद्दल माझ्या मनात शंका आली. बऱ्याच मतदान केंद्रांवर मतदान सुरु असताना अचानक मशीन दोन-तीन तास बंद पडल्या. लोक रांगेत उभे होते. अखेर कंटाळून ते कामाला निघून गेले. संध्याकाळची वेळही वाढवून दिली नाही, त्यामुळे मतदार नाराज झाले. निवडणूक अधिकारी 47 टक्के मतदान झाल्याचं सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मतदान 53 टक्के झाल्याचं सांगितलं. म्हणजे एकाच रात्री 6 ते 7 टक्के मतदार वाढलं कसे ह्याचा संशय आला," असंही श्रीनिवास वनगा म्हणाले.
LIVE भंडारा-गोंदिया निकाल : राष्ट्रवादीचा विजय निश्चित
आजपासूनच 2019 निवडणुकीची तयारी
श्रीनिवास वनगा यांनी सांगितलं की, "मी आजपासूनच 2019 च्या निवडणुकीची तयारी केली आहे. हार-पराजय माझ्यासाठी महत्त्वाचा नव्हता, तर बाबांचं कार्य मला पुढे न्यायचं होतं. 2019ची उमेदवारी मीच मागेन असं नाही, शिवसेना पक्षप्रमुखच निर्णय घेतील. जो कोणी उमेदवार देतील तो मान्य करेन. ह्या भागात पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करेन. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी शिवसेना कशी महत्त्वाची आहे, हे जनतेला पटवून देईन."
पाहा संपूर्ण व्हिडीओ