पालघर : रेल्वे स्थानकात प्रकृती बिघडलेल्या वृद्ध रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यासाठी रिक्षा फलाटावर आणणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द झाल्या. मात्र पालघर रेल्वे स्थानकावर अचानक एका वृद्धाची प्रकृती बिघडली. रेल्वे स्थानकावर उपचारांची व्यवस्था नव्हती आणि डॉक्टरही उपस्थित नव्हते. त्यामुळे वृद्धाला रुग्णालयात नेण्याचा सल्ला परिचारिकेने दिला. मात्र रेल्वे स्थानकात रुग्णवाहिकाही नव्हती. त्यामुळे या वृद्धाला रिक्षाने रुग्णालयात नेण्याचे ठरवण्यात आलं.
या वृद्धाची प्रकृती लक्षात घेता रिक्षा थेट फलाटावर आणण्यात आली. या रिक्षातून त्याला तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र पालघर रेल्वे सुरक्षा बलाने संबंधित रिक्षाचालक पिंटू श्रीवास्तव याच्यावर रिक्षा फलाटावर आणून कायदा हातात घेतल्याप्रकरणी गुन्हाची नोंद करण्यात आली. रिक्षा फलाटावर आणणं हा कायद्याने गुन्हा असल्याचं रेल्वे सुरक्षा बलाने सांगितलं.
मात्र माणुसकी दाखवणाऱ्या एका रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करणं कितपत योग्य आहे, असा सवाल रिक्षा संघटनेने विचारला आहे. एका रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम या रिक्षा चालकाने केलं असेल तर त्यात गुन्हा कसला असा त्यांचा प्रश्न आहे. असं असेल तर रेल्वे स्थानकावर सर्व सोयीसुविधा असणं अपेक्षित आहे. मात्र त्या सुविधा नसल्यामुळे रिक्षा आणण्याची वेळ आली, असं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे.