मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि कृषीतज्ञ पी. साईनाथ यांनी आज (बुधवार) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. शेतकरी पीक विमा योजना, दुष्काळग्रस्त गावांचे पुनर्वसन आणि शेतकरी कर्जमुक्ती या विषयांवर साईनाथ आणि उद्धव यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी साईनाथ यांच्यासोबत कृषी तज्ज्ञ किशोर तिवारीदेखील उपस्थित होते


नेशन फॉर फार्मर्स या प्लॅटफॉर्मद्वारे कृषी संकट आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात संसदेत विशेष अधिवेशन बोलावा, अशी मागणीदेखील पी साईनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे.

राष्ट्रीय कृषी आयोगाकडे सरकारकडे केवळ शिफारशी करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे एक कायमस्वरूपी कृषी कल्याण आयोग स्थापन करण्याची गरज आहे. तसेच या परिषदेमार्फत प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या वीस वर्षांच्या स्थितीवर श्वेतपत्रिका काढा. त्यानंतर यावर चर्चेसाठी राज्यात आणि संसदेत तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन बोलवा. याची केंद्रात दखल घेतली जावी, यासाठी दबाव बनवण्याची मागणी पी. साईनाथ आणि किशोर तिवारी यांनी उद्धव ठाकरेंकडे मांडली.

या मागण्यांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचेही साईनाथ यांनी सांगितले. तसेच पक्षातील राजकारणाशी माझा संबंध नसून केवळ शेतकरी हिताशी संबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या भेटीविषयी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. पी. साईनाथ यांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत कृषीविषयक समस्यांची चर्चा करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो, असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.


पी. साईनाथ यांना भारतातील कृषी आणि ग्रामीण पत्रकारितेचा चेहरा मानले जाते. 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकात त्यांनी ग्रामीण संपादक म्हणून काम केले आहे. पत्रकारितेतील विशेष कमाबद्दल पी. साईनाथ यांना मानाचा रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.