मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिचे पती हिमालय दासानी यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जुगार अड्डा चालवल्याच्या आरोपातून मुंबईतील अंबोली पोलिसांनी हिमालय यांना मंगळवारी अटक केली होती. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली.


गेल्या महिन्यात अंबोली पोलिसांनी छापेमारी करुन अनधिकृतपणे जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर हिमालय दासानी जुगाराचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं होतं.

सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया' चित्रपटात झळकल्यामुळे मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन प्रसिद्ध झाली होती. 1990 मध्ये तिने हिमालय दासानी यांच्यासोबत विवाहगाठ बांधली. त्यानंतर भाग्यश्री फारशी बॉलिवूडमध्ये चमकली नाही.

मोजक्या हिंदी चित्रपटांनतर तिने तेलुगू, बंगाली, भोजपुरी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 2003 साली भाग्यश्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. मात्र अवघ्या तीन चित्रपटांनंतर तिने आपला मोर्चा टीव्हीकडे वळवला.

भाग्यश्री आणि हिमालय यांना अवंतिका आणि अभिमन्यू अशी दोन मुलं आहेत.