कल्याण : डोंबिवली एमआयडीसीमध्ये अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तर आज डोंबिवली ऑरेंज पाऊस पडला आहे. मागच्याच वर्षी एमआयडीसीच्या दावडी गावात गणेशमूर्ती काळवंडल्याचा प्रकार घडला होता.


मागच्या वर्षी एमआयडीसीच्या दावडी गावात गणेशमूर्ती काळवंडल्याचा प्रकार घडला होता. नाल्यात हिरवं, लाल रंगाचं पाणी येणं, घरातल्या भांड्यांवर काळ्या पावडरचा थर जमणं हे प्रकारही डोंबिवलीकरांना नवीन नाहीत. त्यातच आज सकाळी डोंबिवली एमआयडीसी भागात पाऊस पडत असताना या पाण्यावर तेलाचा तवंग असल्याचं काही कंपनी मालकांना आढळून आलं.



पावसाच्या पाण्याचे नमुने घेऊन ठेवण्यात आले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याची तक्रार करण्यात आली आहे. हा प्रकार प्रदूषणामुळेच घडल्याचा स्थानिकांचा दावा असून आसपासच्या कंपन्यांमधून सोडला जाणारा एखादा वायू पाण्याच्या संपर्कात आल्याने पावसाच्या पाण्यावर हा तवंग आल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता याप्रकरणी लवकरात लवकर तपास करून प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.