मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आरे बचाव चळवळीच्या बाजूने आहे हे स्पष्ट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आरे वसाहतीत आल्या. याआधी वृक्षप्राधिकरण समितीतील राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक कप्तान मलिक यांनी मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीच्या बाजूनं मतदान केलं होतं.


सुप्रिया सुळेंनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याने गोरेगाव आरेतील प्रस्तावित कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधातील आवाज आणखी बुलंद होत चालला आहे. आज भर पावसातही आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकासमोर मुंबईकरांनी एकत्र येऊन आरेतील वृक्षतोडीला विरोध दर्शवला. शेकडो मुंबईकरांनी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे आरेतील कारशेडला विरोध केला.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आरे कॉलनीतील रहिवाशांशी संवाद साधला. मुंबई महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीने पास केलेल्या प्रस्तावामध्ये आरेतील झाडं तोडण्याच्या बाजूने राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी मतदान केलं होतं.

वृक्षप्राधिकरण समितीमध्ये राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे, या नगरसेवकानंही आरेतील कारशेडच्या बाजूनं मत दिलं आणि त्यामुळे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरे बचाव मोहिमेतील सहभागाला आंदोलकांनी विरोध केला होता. आता आरे बचाव मोहिमेचा राजकीय फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी या आंदोलनात उतरतेय का हा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.


मात्र, राष्ट्रवादीची भूमिका ही पर्यावरणाच्या बाजूनेच आहे, राष्ट्रवादी आरे बचाव चळवळीच्या बाजूनेच उभी राहील. आरेच्या प्रस्तावावेळी नगरसेवक कप्तान मलिक यांनी वृक्षतोडीच्या बाजूने मतदान का केलं याचं स्पष्टीकरण पक्षाकडून त्यांना विचारण्यात येईल आणि नंतर त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.


त्याचप्रमाणे आम्ही विरोधक आहोत सत्ताधारी नाही, आमच्या एका मतामुळे आरेत कारशेड उभं राहत नाही हेदेखील त्यांनी आंदोलकांना सांगितलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. एकीकडे आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध करायचा दुसरीकडे मात्र मेट्रो भवनाच्या कार्यक्रमाला जायचं हा दुटप्पीपणा नाही का हा सवालही सुप्रिया यांनी केला आहे.