मुंबई : आज मुंबईत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत काय झाले यापेक्षा जास्त चर्चा तिथे लावलेल्या बॅनरचीच आहे. या परिषदेच्या वेळी आमीर खानच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी करत विरोधकांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र'चे पोस्टर तयार केले आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ठगांच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या बॅनरवर आमीर खानच्या जागी देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले आहेत. शिवाय 'ठगबाजीची चार वर्षे' असे शीर्षक या पोस्टरला दिले आहे. उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात तयारी करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या चार वर्षांच्या कार्यकाळाला विरोधकांनी ठगबाजीची चार वर्षे असे संबोधले आहे. त्यावर त्यांनी जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी आणि बेरोजगारांशी ठगबाजी अशी विविध शीर्षकं दिली आहेत. त्याद्वारे त्यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र', विरोधकांची बॅनरबाजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2018 02:30 PM (IST)
विरोधकांनी सरकारवर बोचरी टीका करणारे एक पोस्टर तयार केले आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील ठग असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -