Aryan Khan Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Cruise Drugs Case) जेव्हापासून बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक झालीये, तेव्हापासून या प्रकरणात दररोज नवनवे गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. परंतु, या संपूर्ण प्रकरणात सत्य काय आहे? खरंच मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात वेगळाच खेळ रचला जात होता का? यांसारख्या अनेक गोष्टींचा खुलासा एबीपीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये झाला आहे. 


खाजगी गुप्तहेर केपी गोसावी (KP Gosavi) अँड कंपनी एनसीबीच्या नावानं खंडणी उकळण्याचं काम करत होता. या खंडणी प्रकरणातील पहिला पुरावा म्हणजे, एबीपी न्यूजच्या हाती लागलेलं एक व्हॉट्सअॅप चॅट आहे. हे चॅट 3 ऑक्टोबरचं असून या चॅटमार्फत क्रूझ ड्रग्ज प्रकरणात NCB चे दोन पंच केपी गोसावी आणि प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांच्यातील संभाषणातून या प्रकरणातील अनेक गुपितं उलगडत आहेत. 


कोण आहे किरण गोसावी? 


केपी गोसावी सर्वात आधी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत एक सेल्फीमध्ये दिसून आला होता. केपी गोसावी एक खाजगी गुप्तहेर आहे. परंतु, सध्या तो खंडणी प्रकरण आणि फसवणूकीच्या आरोपांमुळे तुरुंगात आहे. 


प्रभाकर साईल कोण? 


एबीपी न्यूजच्या हाती जे व्हॉट्सअॅप चॅट लागलं आहे. त्यामध्ये उल्लेख असलेला प्रभाकर साईलचा उल्लेख आहे. ते मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील NCB चे दुसरे पंच आहेत आणि केपी गोसावीचा ड्रायव्हर आहे. प्रभाकर साईलनं NCB च्या विजिलेंस पथकाला एक अॅफिडेविट दिलं आहे. ज्यामध्ये क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानची अटक आणि कथित वसुली प्रकरणाशी निगडीत अनेक खुलासे केले आहेत. प्रभाकर साईलनं केपी गोसावीसोबत केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे फोटोही एनसीबीकडे दिले आहेत. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये केपी गोसावीनं प्रभाकर साईल यांना मेसेज करुन काही काम करण्यास सांगितली होती. 


NCB च्या नावे खंडणीचा खेळ 


केपी गोसावी प्रभाकर साईलला : हाजी अलीला जा आणि सांगितलेलं काम पूर्ण करुन ये, तिथून घरी परत ये. 


प्रभाकर साईल : हो सर. 


केपी गोसावी : बाहेरून ताळा लावून घे आणि चावी खिडकीतून हॉलमध्ये फेक 


प्रभाकर साईल : ठिक आहे. 


केपी गोसावी : लवकर जा आणि लवकर परत ये. 


प्रभाकर साईल आणि केपी गोसावीचं व्हॉट्सअॅप चॅट या गोष्टीचा पुरावा आहे की, क्रूझ ड्रग पार्टीमध्ये NCB च्या छापेमारीनंतर खूप मोठा खेळ रचण्यात आला होता. प्रभाकर साईलनं एनसीबीला दिलेल्या अॅफिडेविटनुसार, त्याला केपी गोसावीनं हाजी अलीला जाऊन इंडियाना हॉटेलजवळ कोणाकडून तरी 50 लाख रुपये कॅश आणण्यासाठी सांगितली होती. प्रभाकर साईल तिथे सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी पोहोचला. जिथे एक पांढऱ्या रंगाची गाडी आली आणि त्यातून आलेल्या व्यक्तीनं 2 पैशांनी भरलेल्या बॅग प्रभाकरकडे दिल्या. 


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचा पंच केपी गोसावी पडद्यामागून खंडणी वसुल करत होता. गोसावीनं सांगितल्यामुळं प्रभाकर साईल नोटांनी भरलेल्या दोन बॅगा घेऊन आला होता. ही माहिती स्वतः प्रभाकर साईलनं आपल्या एफिडेविटमध्ये लिहिली आहे. यामध्ये प्रभाकर साईलनं आणखी एक खुलासा केला आहे की, क्रूझ पार्टीत एनसीबीनं रेड टाकण्यापूर्वी त्या पार्टीतील 10 लोकांची हिटलिस्ट केपी गोसावीकडे आधीपासूनच होती.