मुंबई : बुलेट ट्रेनबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीचं अध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे राखलं आहे. मात्र या प्रकल्पात शिवसेनेनं कोणताही खोडा घालू नये, यासाठी सेनेच्या एकाच मंत्र्याला समितीत स्थान देण्यात आलं आहे.


मुख्यमंत्री उपसमितीचे अध्यक्ष असून बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये सेनेचा अडथळा येणार नाही याची मुख्यमंत्र्यांनी काळजी घेतल्याचं चित्र आहे. स्वतःच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमत त्यांनी सर्व अधिकार स्वतःकडे घेतले आहेत.

उपसमितीत भाजपच्या तीन आणि शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना स्थान द्यावं, अशी मागणी सेनेने केली होती. मात्र भाजपतर्फे विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील तर शिवसेनेतर्फे फक्त दिवाकर रावते अशा एकूण तीन मंत्र्यांनाच स्थान देण्यात आलं आहे.

मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनचा खर्च व्यवहार्य आहे का असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उपसमितीची मागणी केली होती. यासह काही मुद्दे उपस्थित करत मंत्रिमंडळ बैठकीत बहिष्कार टाकला होता

मंत्रिमंडळ बैठकीत बुलेट ट्रेनचा राज्यातील मार्ग बांधण्याबाबतच्या प्रस्तावाला औपचारिक मंजुरीच्या प्रस्तावाला रावते यांनी असमर्थता दर्शवली होती. या बुलेट ट्रेन मार्गाच्या आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी उपसमितीची मागणी करण्यात आली होती.