मुंबई : ‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेने एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.
मनसेचे मुंबई महापालिका निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.
कोण आहेत संजय तुर्डे?
संजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संजय तुर्डे आपल्या कार्यकर्त्यांसह घराबाहेर जल्लोष साजरा करत होते. परंतु याचवेळी संजय तुर्डे आणि 20 ते 25 कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. ज्यात तुर्डे यांच्यासह पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी हल्ला केल्याचा आरोप संजय तुर्डे यांनी केला होता.
शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडले
मनसेचे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या जबरदस्त खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.
काल (गुरुवार) भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच सर्व चर्चांना सुरुवात झाली. शिवसेनेनं ही खेळी एवढ्या शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपला याचा थांगपत्ताही लागला नाही.
दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरेंचा संताप
मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक फोडून, शिवसेनेने मास्टरस्ट्रोक मारला आहे. मात्र यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच संतापल्याचं सांगण्यात येत आहे. एकमेकांविरोधात लढलो असताना, असा दगाफटका करणं योग्य नाही, अशी तंबीच राज ठाकरे यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे.
याशिवाय मनसेचे जे 6 नगरसेवक गटनोंदणी करणार आहेत, त्यांच्या नोंदणीस परवानगी देऊ नये, असं पत्र मनसेने कोकण आयुक्तांना लिहिलं आहे.
संबंधित बातम्या :
शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप
मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Oct 2017 03:58 PM (IST)
सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -