VIDEO : मारेकऱ्याशी दोन हात, मुलाच्या बचावासाठी आईचा संघर्ष!
एबीपी माझा वेब टीम | 13 Oct 2017 10:59 AM (IST)
पोटच्या मुलावर हल्ला करण्यासाठी जेव्हा मारेकरी पुढे सरसावला त्यावेळी आईनं मागचा पुढचा विचार न करता मारेकऱ्याला जबरदस्त विरोध केला.
वसई : मुलावर येणारे संकट दूर करण्यासाठी मातेच्या अंगात कसं दहा हत्तींचं बळ संचारत याची प्रचिती वसईमध्ये आली आहे. बुधवारी सायंकाळी वसईतील गुलमोहर सोसायटीत पूजा जिजोट या महिलेच्या घरी अचानक रसूल खानने प्रवेश केला आणि मुलाला मारण्यासाठी चाकू उगारला. त्यानंतर पूजा यांनी मुलाला बेडरुममध्ये आत जायला सांगून आतून कडी लावायला सांगितली. त्यानंतर त्यांनी शेवटपर्यंत मारेकऱ्याचा हात धरुन ठेवला आणि त्याच्या बोटाला कडकडून चावाही घेतला. या सर्व प्रकारानंतर काही जण त्यांच्या मदतीला धावून आले. त्यानंतर त्यांनी मारेकऱ्याला पोलिसांच्या हवाली केलं. अशा पद्धतीनं एका मातेनं आपली सर्व ताकत पणाला लावून स्वतःचा आणि मुलाचा जीव वाचवला. इतकेच नाही तर त्या मारेकऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देखील दिलं. पोलिसांनी रसूल खानला अटक केली असून चाकूही ताब्यात घेतला आहे. मात्र आरोपीने हल्ल्या करण्याचा प्रयत्न का केला याबाबतचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पोलिसांकडूनही याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. पूजा जिजोट या भाजप युवामोर्चाचे अध्यक्ष वीरेंद्रकुमार यांच्या पत्नी आहेत. याआधी वीरेंद्रकुमार यांच्यावर सुद्धा दोन वेळा हल्लाच्या प्रयत्न झाला होता.