मुंबई : बेस्ट, लोकल रेल्वे, मोनो आणि मेट्रो या सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकच तिकीट व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात येत आहे. या प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचं काम 1 मार्चपासून सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुंबईत विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी वेगवेगळं तिकीट काढावं लागतं. यामुळे प्रवाशांचा वेळही जातो, शिवाय धावपळही होते. त्यामुळे एक तिकीट प्रणाली राज्य सरकारच्या विचाराधीन होती. अखेर त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बेस्ट, लोकल रेल्वे, मोनो आणि मेट्रो तसेच मुंबई आणि ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई येथील परिवहन सेवांसाठी एकच तिकीट प्रणाली असणार आहे. ही तिकीट प्रणाली अकाऊंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठूनही रिचार्ज करता येणार आहे.
प्रणालीच्या कार्यचालनासाठी विशेष उद्देश वहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बेस्ट, मोनोरेल आणि लोकल रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा समावेश होणार आहे. त्यानंतर वाहनतळ, टोल, टॅक्सी, रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे.
देशातला पहिला प्रयोग राजधानी दिल्लीत
राजधानी दिल्लीतील लोकांना केजरीवाल सरकारने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर खास भेट दिली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बस आणि मेट्रोसाठी एक कार्ड जारी केलं, ज्यामुळे बस आणि मेट्रोत एकाच कार्डने प्रवास करता येईल.
या कार्डचा वापर विविध मार्गांवर चालणाऱ्या 200 डीटीसी बस आणि 50 क्लस्टर बसेसशिवाय मेट्रोमध्येही करता येईल. दिल्ली हे देशातील पहिलं शहर आहे, जिथे अशा कॉमन मॉबिलिटी कार्डचा वापर होईल.
1 एप्रिलपासून डेबिट कार्डप्रमाणे असणाऱ्या या कार्डचा वापर केला जाईल. दिल्लीत सध्या जवळपास 3900 डीटीसी आणि 1600 क्लस्टर बस आहेत. यामुळे प्रवाशांचा आता मेट्रोच्या तिकिटाच्या रांगेत थांबण्याचा वेळ वाचेल, शिवाय बसमध्येही तिकिट काढण्याची गरज लागणार नाही.