मुंबई : ईडीने आता नीरव मोदीशी थेट संबंध असलेल्या 41 कंपन्यांबद्दल तपास सुरु केला आहे. या कंपन्या बनावट असल्याचा संशय ईडीला आहे. तपास यंत्रणांच्या मते याच कंपन्यांच्या माध्यमातून नीरव मोदीने आपला पैसा देशाबाहेर वळवला. आता या कंपन्यांबद्दल कसून चौकशी होणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 300 कोटींचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीविरोधात कारवाईचा बडगा सुरुच आहे. अंमलबजावणी संचालनालयानं नीरवच्या 30 कोटींच्या बँक ठेवी गोठवल्या आहेत, तर 13.86 कोटींचे शेअर्स जप्त केले आहेत.
याशिवाय 60 प्लॅस्टिकचे कार्टन्स भरलेली घड्याळं, 176 स्टीलची कपाटं जप्त करण्यात आली आहेत. त्यापूर्वी ईडीनं 9 लक्झरी कार्स जप्त केल्या होत्या. त्यामध्ये एक रोल्स रॉयस, एक पोर्शे, दोन मर्सिडीज बेंझ, एक फॉर्च्युनर, तीन होंडा सिटी, एक इनोवा कारचा समावेश आहे.
अंधेरीच्या अरीना हाऊसमधील गीतांजली शोरुमबाहेर गीतांजलीच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. सध्या या शोरुमला कुलूप लावण्यात आलं आहे.
कुठलीही नोटीस न देता कंपनीच्या शोरुमला कुलूप ठोकण्यात आल्यानं या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. यातील काही कर्मचारी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून इथे काम करतात. मात्र पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीसोबत गीतांजलीचा मालक मेहुल चोक्सीही गायब असल्यानं गीतांजलीचे शोरुम्स बंद करण्याची वेळ आली.
शोरुम अचानक बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. रोजच्या गरजा भागवणंही आपल्याला जड जाणार असल्याचं गीतांजलीचे कर्मचारी सांगत आहेत.