मुंबई : सांताक्रूजमधील वाकोला परिसरात नवर्वषाच्या पार्श्वभूमीवर अॅन्टी नार्कोटिक्स विभागानं मोठी कारवाई केली आहे. या परिसरातून जवळपास 1 हजार कोटींचं ड्रग पोलिसांनी जप्त केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.


फेंटानिल नावाचं 100 किलो ड्रग पोलिसांनी जप्त केलं आहे. 25-25 किलो फेंटानिल ड्रग चार बॅगांमध्ये भरण्यात आलं होत. वाकोला परिसरात एका कारमध्ये हे ड्रग सापडलं आहे. देशातील आजवरची ही ड्रग्ज जप्तीची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.


खबरींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी सलीम इस्माईल धाला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी आणि धनशाम रामराज सरोज या चौघांना अटक केली आहे. सलीम कॉटन ग्रीन परिसरात ड्रायव्हरचं काम करतो. याआधीही गांजा बाळगल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी 2013मध्ये अटक केली होती.


संदीप तिवारी हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. चंद्रमणी यांचं कांदिवलीतील ठाकूर विलेज परिसरात मोबाईलचं दुकान आहे. सर्व आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.