मुंबई : कोरोना व्हायरसमुळे आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा बळी गेला आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दीपक हाटे यांचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. दहा दिवस शासकीय केंद्रात उपचार घेतल्यानंतर हाटे यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र घरी परतल्यानंतर चार तासांतच त्यांचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील मृतांची संख्या 15 पेक्षा जास्त झाली आहे.


दीपक हाटे वरळी पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. 18 मे रोजी त्यांची प्रकृती खालावली होती. तपासणीनंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होताच त्यांना वरळीच्या वल्लभभाई स्टेडियम येथील शासकीय केंद्रात दाखल करण्यात आले होते. दहा दिवस उपचार घेतल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. हाटे यांचा एक व्हिडीओ शुक्रवार सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. या व्हिडीओत दीपक हाटे अशक्त असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.


मात्र दीपक हाटे दहा दिवसांच्या उपचारानंतर बरे झाले होते, तर त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्यांच्या उपचारात हलगर्जीपणा तर झाला नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


Coronavirus | कोरोनावरील दहा दिवसांच्या उपचारानंतर घरी परतल्यावर चार तासात मृत्यू