कल्याण : चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट झाल्याची घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे. या घटनेत एक तरुण जखमी झाला आहे. अमित भंडारी असं या जखमी तरुणाचं नाव आहे.
अंबरनाथच्या कोहोजगाव भागात राहणाऱ्या अमित याने वर्षभरापूर्वी अॅप्पल कंपनीचा महागडा आयफोन 6 हा फोन विकत घेतला होता. रविवारी रात्री अमित याने घरी हा मोबाईल चार्जिंगला लावला होता. यावेळी मोबाईलवरील मेसेज वाचत असतानाच अचानक मोबाईलचा स्फोट झाला.
स्फोट होताच अमितने मोबाईल हातातून गादीवर फेकल्याने घरातल्या कापसाच्या गादीलाही आग लागली. या घटनेत अमित याच्या दोन्ही पायांना भाजलं असून मोठी दुखापत झाली आहे. याप्रकरणी अॅप्पल कंपनीकडे तक्रार करणार असल्याचं अमितने सांगितलं आहे.
गेल्या काही काळात मोबाईलचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेकांना या अपघातात गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे मोबाईल वापरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र आयफोनसारख्या मोठ्या कंपनीच्या फोनचाही स्फोट झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.