सायन हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार, एकाला अटक
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2019 11:34 PM (IST)
मुंबईतील रुग्णालयसुद्धा महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका 37 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई : मुंबईतील रुग्णालयसुद्धा महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका 37 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सायन रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक येथे 24 तास तैनात असतात. तरीदेखील या रुग्णालयात बलात्काराची घटना घडल्यामुळे पोलीस चक्रावून गेले आहेत. पीडित महिलेची बहीण रुग्णालयात उपचार घेत आहे. बहिणीची देखभाल करण्यासाठी सदर महिला रुग्णालयात आली होती. आरोपी नियमित रुग्णालयात येत होता. शुल्कामध्ये सवलत देणारा फॉर्म भरण्याच्या बहाण्याने आरोपी पीडित महिलेला रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली. व्हिडीओ पाहा सायन रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने डॉक्टरांवर हल्ले होत असल्याने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तरीदेखील रुग्णालयात बलात्काराची घटना कशी घडली? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. परंतु रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्या लोकांच्या खांद्यावर रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांच्याकडून सुरक्षा व्यवस्थेमध्ये हलगर्जीपणा झाला असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.