भिवंडी : मे महिन्यात अनेक जोडपी लग्न बंधनात अडकत असतात. त्यामुळे मे महिन्यात अनेकांच्या लग्नाचे वाढदिवस देखील साजरे करण्यात येत असतात. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती पत्नी एकमेकांना भेटवस्तू देखील देत असतात. मात्र भिवंडीतील कोनगाव येथील एका पतीने लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने आपल्या पत्नीला चक्क एक किलो सोन्याचा हार भेट दिला. या भेटीने पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पत्नीने हा हार भेट देतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला. त्यानंतर व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत नवरा हार भेट देतांना हिंदी चित्रापटाचे गाणे गातांना देखील दिसत आहे. एन लोकडाऊन काळात नवऱ्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला आपल्या बायकोला एवढा महागडी भेट दिल्याने तालुका, जिल्ह्या बरोबरच राज्यात सर्वत्र या गिफ्टची मोठी चर्चा रंगली होती.
भिवंडीतील तालुक्यातील कोन गाव येथील रहिवासी बाळा कोळी यांनी आपल्या लग्नाच्यावाढ दिवसानिमित्त आपल्या पत्नीला चक्क एक किलो वजनाचा सोन्याचा हार भेट दिल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोनगाव पोलिसांनी बाळा कोळी यांना पोलीस ठाण्यात बोलावून सोन्याच्या महागड्या हाराची सुरक्षा कशी कराल, एवढी महागडी वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा इतर अन्य ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला. त्यावेळी बाळा कोळी यांनी सांगितले की, "हा हार नकली आहे." हार नकली असल्याचे समजताच पोलिसांना देखील आश्चर्य वाटले.
बाळा कोळी यांनी कल्याणच्या एका ज्वेलर्स मधून 1 किलो ग्रॅम सोन्याचा हार खरेदी करून आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला दिला होता याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी त्या ज्वेलर्स मध्ये जाऊन माहिती घेतली असता ज्वेलर्स मालकाने हा हार नकली असल्याचे सांगितले. तसेच 38 हजार रुपयांना हा हार खरेदी करण्यात आल्याचे ज्वेलर्स मालकाने सांगितल्यानंतर पोलिसांनाही हा हार नकली असल्या बाबतची खात्री पटली व हार हा नकली असल्याबाबत ही निष्पन्न झाले.
दरम्यान अशा प्रकारे सोन्याच्या अलंकारांचा गाजावाजा नागरिकांनी करू नये, अशा प्रकारे सोन्याच्या दागिन्यांची माहिती चोरट्यांना समजली तर त्यामुळे चोरी व दरोड्याच्या घटना घडण्याची शकता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारे कोणतीही बाब सोशल मीडियावर टाकून त्याचे प्रदर्शन करू नये असे आवाहन कोनगाव पोलिसांनी केले आहे.