पालघर : पालघर जिल्ह्यात भूकंपाचं सत्र सुरच आहे. आज दिवसभरात भूकंपाच्या 5 धक्क्यांनी पालघर जिल्हा हादरला. भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरुन घरातून धावत बाहेर पडणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


पालघरला आज सकाळी 7 वाजता भूकंपाने पहिला तडाखा दिला. सर्व शांत होत नाही तोवर जमीन पुन्हा हादरली. या भूकंपाने पालघरकरांना अक्षरश: रस्त्यावर आणलं. लोक दुकान, घरं सोडून रस्त्यावर आले. इतकचं काय शाळेवतील विद्यार्थीही जीव मुठीत घेऊन मैदानात दाखल झाले.


पालघरला भूकंपाचे धक्के काही नवीन नाहीत. मात्र एकाच दिवसात लागोपाठच्या धक्क्यांनी मात्र कहर केला. घरांच्या भिंतीना पडलेल्या भेगांनी भूकंपाची तीव्रता दाखवली. लागोपाठच्या धक्क्यांनी भेदरलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा शाळेत जायची हिंम्मत होत नाही.


पालघरमध्ये भूकंपाची वारंवारता, तीव्रता आणि व्यापकता ही दिवसागणीक वाढत आहे. हे वाढते धक्के मोठ्या भुकंपाची चाहूलही असू शकतात. मात्र तीन भूकंप मापन करणाऱ्या यंत्रांशिवाय सरकारने काय उपायोजना केल्या हा प्रश्न जनतेला पडला आहे.


तलासरी आणि डहाणू तालुके गेल्या तीन महिन्यापासून भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भीतीने नागरिकांना रात्री-अपरात्री घराबाहेर अंगणात उघड्यावर झोपावे लागत आहे. आतापर्यंत 14 पेक्षा जास्त वेळा भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.


पालघरमधील भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम


- 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल


- 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल


- 1 डिसेंबर - 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केल


- 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल


- 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल


- 10 डिसेंबर - 2.8 व 2.7 रिश्टर स्केल


- 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल


- 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल


- 1 फेब्रुवारी - 3.3, 3.5, 3.0, 4.1 रिश्टर स्केल