वसई : गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला जुना वर्सोवा पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग 8 वर घोडबंदर जवळ असलेल्या जुन्या वर्सोवा ब्रिजच्या गर्डरला सप्टेंबर महिन्यात तडे गेले होते.


दुरुस्तीच्या कामासाठी गेले आठ महिने जुना वर्सोवा ब्रिज अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद होता. केवळ हलक्या वाहनांना ये-जा करण्यासाठी हा ब्रिज खुला ठेवण्यात आला होता. मात्र 14 मे ते 17 मे या चार दिवसांच्या कालावधीत लोड टेस्टिंगसाठी हा ब्रिज पूर्णपणे बंद ठेवण्यात आला.

ब्रिजवरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. इतकंच काय, तर अनेक हिंदी-मराठी मालिकांचे सेट्स या भागात असल्यामुळे कलाकारांनाही इच्छित स्थळी पोहचण्यात अडचणी आल्या.

ब्रिजच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून जुना वर्सोवा ब्रीज खुला करण्यात आला. ब्रीज बंद असल्याने ऐन सुट्ट्यांच्या हंगामात शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांची कोंडी होत होती. प्रचंड वाहतुक कोंडीने वाहनचालक आणि प्रवाशी हैराण झाले होते. अखेर ब्रिज खुला झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे.

मुंबई आणि दिल्ली, गुजरातला जोडणारा हा ब्रिज होता. तास-दीड तास वाहनचालकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. डिसेंबर 2013 मध्येही जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिज सहा महिने बंद होता. आता आठ महिने जुना वर्सोवा ब्रिज बंद होता.