वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदरजवळील वर्सोवा येथील जुन्या खाडी पूलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवार 26 सप्टेंबरपासून मंगळवार 28 सप्टेंबरपर्यंत जड-अवजड वाहनांसाठी जुना पूल बंद करण्यात येणार आहे. यावेळी ठाणे मुंबई येथून पालघर गुजरातकडे जाणारी जड अवजड वाहनांना पर्यायी मार्गावरुन वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर हलकी वाहनं ही जुन्या पुलाच्या एका मार्गीकेकडून चालू राहतील.  यादरम्यान आता प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागणार आहे.


वर्सोवा जुन्या खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी आता तीन दिवस जुन्या पुलाची एक मार्गीका बंद ठेवण्यात येणार आहे. आयआरबीने पोलिसांकडे 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस पूल बंद ठेवण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी आयआरबीला रविवार 26 सप्टेंबर ते मंगळवार 28 सप्टेंबर 2021 पर्यंत तीन दिवसांसाठी जुन्या पूलाची एक मार्गीका बंद ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे जुन्या पुलाच्या एका मार्गीकेतून हलकी वाहनं वाहतुकीसाठी खुली असणार आहेत. यावेळी गुजरातकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना वर्सोवा पुलाकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येणार असून, त्या वाहनांची वाहतूक खालील तीन पर्यायी मार्गांवरुन वळविण्यात येणार आहे.




1. ठाणे शहरातून वर्सोवा मार्गे पालघर सुरत बाजूकडे येणारी जड-अवजड वाहनं ही मुंब्रा-खारेगाव टोलनाका-मानकोली-भिवंडी-वाडा-मनोर-पालघर-मार्गे जातील.


2. मुंब्रा-खारेगाव टोलनाका-मानकोली-भिंवडी-नदी नाक-अंबाडी-वज्रेश्वरी-गणेशपूरी-शिरसाट फाटा मार्गे जातील.


3. मुंब्रा-खारेगाव टोलनाका-मानकोली-अंजूर फाटा-कामण-चिंचोटी-वसई विरार महानगरपालिका हद्दी मार्गे जातील. त्याच बरोबर महसूल विभागाची वाहने पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने इत्यादी वाहनांना हा नियम लागू राहणार नाही.


दरम्यन, यापूर्वी जुना वर्सोवा पुलाला तडे गेल्यानं पहिल्यांदा दिनांक 24 डिसेंबर 2013 रोजी हा पूल सहा महिने बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2016 ला या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. एकदिशा मार्ग सुरु ठेवण्यात आला होता. एकेरी वाहुतक 20 मिनिटं सुरु ठेवली जात असल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता.


11 जून 2014 पासून 15 टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना बंदी घातली आहे. तसेच बंदीचे आदेश ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत. तरीही सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मे 2017 साली चार दिवसांसाठी हा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर हा पुल दुरुस्तीच्या कामासाठी 8 डिसेंबर 2018 ते 23 डिसेंबरपर्यंत बंद होता.