मुंबई : तोट्यात चालणाऱ्या 266 एसी बस काल सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतला. मात्र बंद केलेल्या एसी बसचं पुढे काय हा मोठा प्रश्न बेस्ट प्रशासनासमोर आहे. या एसी बस भंगारात द्याव्या असा बेस्ट प्रशासनाचा विचार आहे.

या एसी बस साध्या बसमध्ये रुपांतरित करुन वापरण्याजोग्या करण्यासही मोठा खर्च येणार आहे. या एसी बस चालवण्याकरता दरमहा 13 कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यापैकी उत्पन्न केवळ 2 कोटींचे, तर तोटा तब्बल 11 कोटींचा आहे. त्यामुळे काही काळानं या बंद केलेल्या एसी बस पुन्हा चालवणं देखील शक्य नाही.

त्यामुळे बेस्ट प्रशासनापुढे या एसी बस भंगारात देणे हा एकमेव पर्याय राहिला आहे. मात्र फायबर बाँडी असलेल्या या बसची भंगारातही फारशी किंमत येणं शक्य नाही. त्यामुळे वर्षाला 200 कोटींच्या तोट्याचा भार टाकणारी एसी बस आता बंद झाली असली तरी भंगारातूनही तिची फारशी किंमत वसूल करता येणं शक्य नाही असंच चित्र आहे.