मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी बेस्टचा नवीन लूक
एबीपी माझा वेब टीम | 18 Apr 2017 05:33 PM (IST)
मुंबई : मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी बेस्टच्या बसना नवा लूक देण्याचं काम सुरु आहे. तोट्यात जाणाऱ्या बेस्टला सावरण्यासाठी मुंबईकर प्रवाशांना बेस्टकडे आकर्षित करणं गरजेचं आहे. त्यासाठीच काही महिन्यांपूर्वी मुंबईतील जे.जे स्कुल आँफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी लाल रंगातील बेस्टचा रंग बदलण्यात यावा असं सुचवलं होतं. त्यानुसार जे.जे स्कुल आँफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्वावर लाल रंगातील बेस्ट बसला पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलं आहे. हा नवा लूक मुंबईकर प्रवाशांच्या किती पसंतीस उतरतोय हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. येत्या काही दिवसांत ही पांढऱ्या रंगातील बेस्ट बस प्रायोगिक तत्वावर रस्त्यांवर धावतांना दिसू शकेल. बेस्टच्या या नव्या लूकमध्ये केवळ तिचा रंग बदलण्यात आला आहे. बसमध्ये कोणतेही अंतर्गत बदल करण्यात आलेले नाहीत. बेस्टच्या या रंग बदलाला यापूर्वीच बेस्ट कमिटीनं विरोध केला होता. त्यामुळे सध्या केवळ प्रायोगिक तत्वावरच पांढऱ्या रंगातील बेस्ट बस रस्त्यावर चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.