मुंबई : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि ज्ञानव्यापी मशिदीबाबत मागील आठवड्यातील शुक्रवारी (10 जून) देशभरात जे काही घडले ते सर्वांनी पाहिले. असाच प्रकार उद्या होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अत्यंत सतर्क झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांसमोरील सर्वात मोठं आव्हान सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे सायबर सेल डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवून आहे. दररोज सुमारे 50 पोस्ट डिलिट केल्या जात आहेत, जेणेकरुन सोशल मीडियावर हिंसेला प्रोत्साहन देण्याचा हेतू नष्ट करता येईल, असं सायबर सेलचे पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितलं.
सध्या सोशल मीडियावर उत्तर भारतातून अनेक पोस्ट वायरल होत आहे. यातील सर्वाधिक व्हायरल पोस्ट नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याबाबत केली जात आहेत, त्यानंतर ज्ञानवापी परिसर वादाशी संबंधित पोस्ट आहेत. पोलिसांसाठी चिंतेची बाब म्हणजे या सोशल मीडिया पोस्ट्समुळे अचानक किती मोठी गर्दी होऊ शकते याचा अंदाज बांधणं कठीण होऊन बसतं.
मात्र, महाराष्ट्र पोलीस सातत्याने मुस्लीम समाजातील गुरु आणि मौलवी यांच्याशी संपर्क साधत आहेत. त्यांनी शुक्रवारच्या नमाजानंतर सगळ्यांना शांतपणे घरी जाण्याचं आवाहन करावं असं सांगत आहेत. नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात तीन एफआयआर दाखल करुन पोलीस या प्रश्नावर योग्य पद्धतीने काम करत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरुन हिंसा पसरणार नाही.
मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ देशभरात मुस्लीम समाज रस्त्यावर
दरम्यान यशस्वी यादव यांनी एबीपीशी साधलेल्या संवादात सांगितलं की, महाराष्ट्र सायबर लॅब अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरुन या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवत आहे. ज्यांना वाटतं की सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलं तर आपल्याला कोणीही हात लावून शकणार नाही, तर तो त्यांचा गैरसमज आहे. भारतात सुमारे 80 कोटी लोक इंटरनेट वापरतात आणि म्हणूनच इंटरनेट हे समुद्रासारखं आहे. अरब स्प्रिंगसारख्या चळवळीत इंटरनेटच्या वापरामुळे एक मोठा गट रस्त्यावर आणि सत्ता उलथवली. त्यानंतर सोशल मीडियाला कमी लेखून चालणार नाही.
राज्यासह, दिल्ली, उत्तर प्रदेशात 10 जून रोजी मुस्लीम समाजाचं आंदोलन
भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात 10 जून रोजी मुस्लीम समाज आणि विविध पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. नमाजनंतर देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली. दिल्लीतील जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. तर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने मुस्लीम समाजातील लोकं आंदोलनाच्या ठिकाणी जमा झाल्याचे पाहायला मिळाल. तसेच प्रयागराजमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दिल्ली आणि उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद, सोलापूर, जालना आणि कोल्हापुरात मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला. औरंगाबादमध्ये जलील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. तर सोलापुरात सुद्धा हजारोच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले. सर्वच ठिकाणाचा जमाव पाहता पोलिसांचा बंदोबस्त कमी पडला