Protest: भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात आज मुल्सिम समाज आणि विवध पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारच्या नमाजनंतर देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. दिल्लीतील जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शने सुरू आहेत. तर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने मुस्लीम समाजातील लोकं आंदोलनाच्या ठिकाणी जमा झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच प्रयागराजमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याच समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झालेल्या गदारोळानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


प्रयागराजमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. डीजीपी डीएस चौहान, कायदा आणि सुव्यवस्थाचे प्रमुख प्रशांत कुमार आणि अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी हे लखनऊ पोलिस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात उपस्थित आहेत. प्रयागराजमध्ये अधूनमधून दगडफेकीच्या घटना घडत आहेत. जाळपोळही झाली आहे. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. 


महाराष्ट्रात ठीक-ठिकाणी जमाव...


दिल्ली आणि उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद,सोलापूर,जालना आणि कोल्हापुरात मुस्लीम समाज रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये जलील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. तर सोलापुरात सुद्धा हजारोच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच ठिकाणाचा जमाव पाहता पोलिसांचा बंदोबस्त कमी पडत असल्याचे चित्र आहे. तर आंदोलनाला एवढी गर्दी होईल याचा पोलिसांना अंदाज आला नसल्याचे बोलले जात आहे.


देशभरात आंदोलन... 


यूपीची राजधानी लखनौशिवाय देवबंद, प्रयागराज आणि सहारनपूरमध्येही प्रचंड गोंधळ झाला. देवबंदमध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील जामा मशीदसमोर सुद्धा हजारोच्या संख्येनी जमाव जमला होता. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये काही ठिकाणी निदर्शने होत आहेत. हैदराबादमधील मक्का मशीद, चार मिनार, अजीझिया मस्जिद, हुमायून नगर, मस्जिद-ए-कुबा, वाडी-ए-मुस्तफा, मस्जिद-ए-सयदना उमर फारूक, चंद्रयांगुट्टा आणि इतर ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांनी बाहेर पडून निषेध केला. आंदोलकांनी नुपूर शर्मा, राजा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.


हावडामध्ये पोलिसांवर दगडफेक


कोलकाता आणि हावडा येथे नुपूर शर्माला अटक करण्याच्या मागणीसाठी निदर्शने झाली. यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. हावडा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून निदर्शने केली. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना हटवले. अशा स्थितीत आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, त्यानंतर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या.