नवी मुंबई : सीबीडीतल्या खाडी किनारी असलेल्या अलिशान ग्लास हाऊसच्या जागी मरिना सेंटर उभारण्यासाठी सिडकोचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण सुप्रीम कोर्टाने संतोष तांडेल यांची याचिका फेटाळली आहे.
सीबीडी येथील खाडी किनारी गणेश नाईक यांनी भाचा संतोष तांडेल यांच्या नावाने जागा घेत आलिशान असे ग्लास हाऊस उभं केलं होतं. 2013 साली हायकोर्टाच्या आदेशानंतर अनधिकृत उभारलेले ग्लास हाऊस तोडण्यात आले. मात्र, राहिलेल्या रिकाम्या जागेवर संतोष तांडेल यांनी स्थगिती मिळवाली होती. काल सुप्रीम कोर्टाने तांडेल यांची याचिका फेटाळून लावल्याने आता सिडकोला ग्लास हाऊसच्या जागेवर मरिना सेंटर उभारता येणार आहे.
सीबीडी येथे खाडी किनारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी भाचा संतोष तांडेलच्या नावाने सिडकोकडून भाडेपट्ट्यावर जागा घेतली होती. या दोन एकर जागेवर अनधिकृत ग्लास हाऊस उभारले होते. या ठिकाणांवरून गणेश नाईक आपला कारभार हाकत होते.
जुलै 2013 रोजी संदीप ठाकूर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सिडकोने ग्लास हाऊसवर कारवाई करत ते जमीनदोस्त केले होते. मात्र यानंतर संतोष तांडेल यांनी स्थगिती आणली होती. या विरोधात याचिकाकर्ते संदीप ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
सुप्रीम कोर्टाने यामध्ये गणेश नाईक यांचा भाचा संतोष तांडेल यांची याचिका फेटाळून लावली होती. याचिका फेटाळून लावल्याने आता सिडकोला संपूर्ण जागेवर ताबा मिळवून या ठिकाणी प्रोजेक्ट उभा करता येणार आहे. या जागेवर सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणारा मरिना सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.