मुंबई : मुंबईतील काँग्रेस आमदार आणि माजी पालकमंत्री नसीम खान यांच्यावर पैसे उधळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. चांदिवली भागात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात खान यांच्यावर नोटा उधळल्या गेल्याची माहिती आहे. या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यास नसीम खान यांनी नकार दिला आहे.

मुंबईतील चांदिवली भागात हिमालय मित्र मंडळात काल (सोमवारी) रात्री हा प्रकार घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पैसे उडवले जात असताना नसीम खानही आनंदाने पाहत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेची झोड उठली आहे.

महत्त्वाचं म्हणजे कालच नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असल्याची चिंता व्यक्त केली होती. नसीम खान हे चांदिवली विधानसभेतून काँग्रेसचे आमदार आहेत.

नसीम खान यांनी हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा केला आहे. मी भानुशाली समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी स्वागत करताना पैसे उडवण्यात आले, असं नसीम खान यांचं म्हणणं आहे. आपण पैसे उडवण्यापासून रोखल्याचा दावाही नसीम खान यांनी केला आहे.

'एबीपी माझा'ने नसीम खान यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला आहे. 'आपण भानुशाली समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांच्या प्रथा-रुढी-परंपरांविषयी मला माहिती नाही. मला त्यांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करायचा नव्हता. त्यामुळे मी दिलगिरी करण्याचा प्रश्नच येत नाही. कार्यक्रमाच्या आयोजकांकडे आपण स्पष्टीकरण मागावं.' असं नसीम खान म्हणाले.

नसीम खान यांच्यावर पैसे उधळणारी व्यक्ती मनसे पदाधिकारी महेंद्र भानुशाली आहेत. 2012 साली भानुशाली यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती.

आमदार नसीम खान यांच्यावर नोटांची उधळण



आमदार नसीम खान यांचा दिलगिरी व्यक्त करण्यास नकार