नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्वात मोठा झोपडपट्टी भाग म्हणून ओळख असलेल्या तुर्भे भागात गेल्या 15 दिवसांपासून एकही कोरोना रूग्ण न आढळल्याने पालिकेसाठी दिलासादायक बाब आहे. आज नवी मुंबई पालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी या भागाचा दौरा करीत आपल्या डॉक्टर, नर्स यांचे कौतूक करत परिस्थितीचा आढावा घेतला.


एमआयडीसी भागाला लागून असलेल्या तुर्भे झोपडपट्टी भागात 1 लाखापर्यंत लोकसंख्या आहे. या भागात 457 कोरोना रूग्ण सापडल्याने कम्युनिटी संसर्ग पसरण्याची मोठी भीती निर्माण झाली होती. मात्र मनपा प्रशासनाने याठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी घेत मिशन तुर्भे कोरोना मुक्तीची सुरुवात केली. घरोघरी जात प्रत्येक व्यक्तीची स्क्रिनिंग करण्यात आली. प्रत्येक गल्लीबोळात दिवसातून दोन तीन वेळा सॅनिटायझिंग करण्यात येत आहे. सार्वजनिक शौचालयाची एका एका तासाला स्वच्छता करण्यात आल्याने कोरोना संसर्गाची मोठी भिती टळली.

Navi Mumbai Lockdown | नवी मुंबईतील 44 ठिकाणी लॉकडाऊन



नवी मुंबईतील सर्वात गंभीर समस्या बनली होती तुर्भो विभागाची. तुर्भे झोपडपट्टीत 22 एप्रिलपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण आढळण्यास सुरवात झाली होती. या परिसरात आतापर्यंत 457 रूग्ण सापडले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्यात या ठिकाणची कोरोना रूग्ण संख्या वाढीचे प्रमाण जास्त असल्याने महानगरपालिका प्रशासनाला डोकोदुखी ठरली होती. मे महिन्यात 268 रूग्ण आढळले होते तर जुनच्या पहिल्या आठवड्यात 182 रूग्ण आढळले होते. यानंतर आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार करीत ‘मिशन तुर्भे कोरोना मुक्त’ हातात घेतले. महानगरपालिका अधिकारी केलास गायकवाड, समीर जाधव, भरज दांडे, नर्स टीम, तुर्भे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून प्रत्येक घर पिंजून काढण्यात आले. कोरोनाच्या भीतीने तुर्भे विभागातील खाजगी डाँक्टरने आपले क्लिनिक बंद करून पळ काढला होता. आयुक्तांकडून त्यांना विश्वासात घेत क्लिनिक सुरू करण्यात आले.

स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचे घरोघरी जावून वाटप केले जात होते. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्याची गरज भासली नाही. प्रत्येक गल्ली बोळात मनपा कर्मचारी दिवसातून दोन तीन वेळा सॅनिटायझरींग करायचे. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होण्यास मदत झाली. झोपडपट्टी बहूल भाग असल्याने येथे सार्वजनिक शौचालयामुळे संसर्ग पसरण्याची भीती होती. माञ प्रत्येक तासाला शौचालयाची सॅनिटायझेशन करत स्वच्छता राखली गेल्याने संसर्ग पसरला नाही. आयुक्त मिसाळ यांनी 13 टीम तयार करून घरोघरी जात प्रत्येक व्यक्तिचे स्क्रिनिंग करण्यात आले. ज्या लोकांना कोरोनाचे लक्षणे आढळली त्यांचे त्वरीत तपासणी करून क्वारंन्टाईन करण्यात आले. या सर्वांचा परिणाम म्हणजेच कोरोना मुक्तीच्या दिशेने पडलेले पाऊल. गेल्या 15 दिवसापासून तुर्भे झोपडपट्टी भागात कोरोना रूग्ण सापडलेला नाही. यापुढेही झोपडपट्टीत कोरोना पसरू नये यासाठी डोळ्यात तेल घालून मनपा प्रशासन काम करीत आहे.