मुंबई : मुंबईत कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव झाला आणि पाहता पाहता संपूर्ण मायानगरी आणि उपनगरंही याच विषाणूच्या विळख्यात आली. यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण (Dharavi) धारावी झोपडपट्टी या भागात पाहायला मिळाल्यामुळं हा परिसर कोरोना ह़ॉ़टस्प़़ॉट म्हणून घोषित करण्यात आला.


धडकी भरेल अशीच कोरोना रुग्णसंख्या धारावीमध्ये पाहायला मिळाली होती. पण, पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अशा कोविड योद्ध्यांच्या योगदानानं आणि अर्थातच नागरिकांच्या सहकार्यानं धारावीनं कोरोनाशी लढा दिला आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच अंशी हा लढा यशस्वीही ठरला.


शुक्रवारी आलेल्या नव्या आकडेवारीनुसार धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये लक्षवेधी प्रमाणात कमी झाली आहेत. त्यातच नाताळच्या दिवशी समोर आलेल्या आकडेवारीप्रमाणं मागील 24 तासांत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या या परिसरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. कोरोनाचा नवा एकही रुग्ण न आढळणं ही एक मोठी दिलासादायक बातमीच.


एप्रिल महिन्यात धारावीत पहिला कोरोना रुग्ण आढळला. ज्यानंतर साडेसहा लाखांच्या आसपास लोकसंख्या आणि दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या या परिसरात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. पण, सध्या इथं सक्रिय रुग्णांची संख्याही अवघी 12 इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यापैकी 8 जण होम क्वारंटाईन असल्याचं कळत आहे. धारावीची कोरोना मुक्तीच्या दिशेनं होणारी ही वाटचाल अनेक ठिकाणी धारावी मॉडेल नावानं कोरोना विळख्यापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शकही ठरली.





आता आव्हान ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचं...


मागील काही दिवसांमध्ये मुंबईत ब्रिटनमधून आलेल्यांचा आकडा मोठा आहे. मुंबई, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई अशा भागांमध्ये ब्रिटनमधून आलेल्यांना शोधून त्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत आहेत का, या धर्तीवर आता पुढील पावलं उचलली जाणार आहेत. त्यामुळं ब्रिटनच्या कोरोनाचा शिरकाव होऊन त्याचा संसर्ग पसरण्याचं संकट ओढावण्यापूर्वीच ते थोपवून लावण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे.