मुंबई : कोरोनाच्या काळात काही जण स्वतःच  नवीन उपचार पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न करत असून त्यापैकीच काही लोकांनी फिजीओथेरपीच्या नावाखाली कोरोनाच्या रुग्णांसाठी चुकीचे उपचार करत असल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहे. त्यामुळे रुग्णाचा आणि त्याच्या नातेवाईकांचा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असून या अशा चुकीच्या उपचारांमुळे कोरोनाबाधित रुग्णांना फायदा होण्याऐवजी त्रास अधिक होऊ  शकतो. त्यामुळे नागरिकांनी या व्हिडीओकडे दुर्लक्ष करून  कोणतेही उपचार करू नये, असा सल्ला महाराष्ट्र व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) व भौतिकोपचार (फिजिओथेरपी) परिषदने दिला असून असे व्हिडीओ बनवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात असल्याचेही सांगण्यात आले आहे.    


सध्या कोरोनाबाधित रुग्ण बरा व्हावा याकरिता वैद्यकीय तज्ञ 'येन केन प्रकारेण'  प्रयत्न करत आहे. गंभीर रुग्ण बरे करण्याकरिता डॉक्टरांच्या आणि औषधाच्या जोडीला आणखी वैद्यकीय क्षेत्रातील आणखी काही लोकं मदत करत असतात त्यापैकी एक फिजिओथेरपिस्ट (भौतिकोपचार शास्त्र तज्ञ). या फिजिओथेरपिस्टच्या साहाय्याने अनेक गंभीर रुग्णांना बरं करण्यास डॉक्टरांना यश प्राप्त झाले असून त्यांचं यामध्ये महत्तवपूर्ण योगदान असल्याचे डॉक्टरांनी  अधोरेखित केले आहे. विशेष म्हणजे फिजिओथेरपिस्ट, अतिदक्षता विभागातील डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून या विभागात रोज हजेरी लावून  पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई ) किट - स्वयं सरंक्षक पोशाख घालून  रुग्णांना व्यवस्थित उपचार देत आहेत. सर्व सामन्यांना हे माहित नसले तरी जगभरात कोविड19 चे रुग्ण बरे करण्यात फिजिओथेरपीच योगदान अधोरेखित करण्यात आले आहे.


गेल्या काही दिवसात बुलढाणा आणि पालघर परिसरात फिजीओथेरपीच्या नावाखाली कोरोनाच्या रुग्णांसाठी चुकीचे उपचार देत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र महाराष्ट्र व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) व भौतिकोपचार (फिजिओथेरपी) परिषदने याची गंभीर दाखल घेलती आहे. याप्रकरणी, याप्रकरणी, या परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुदीप काळे, सांगतात की, "कोरोना मुख्यत्वे श्वसन प्रणाली वर आघात करत असल्याने अशा रुग्णांमध्ये फिजिओथेरपीचे महत्व वाढत आहे. ए.आर.डी एस (श्वसन संस्थेशी निगडित आजार) न्युमोनिया या आजारामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, असे रुग्ण काही वेळा अतिदक्षता विभागात दाखल होतात. या अशा  रुग्णांमध्ये आढळणाऱ्या गंभीर लक्षणांमध्ये फिजिओथेरपीची मदत  होत असल्याचे विविध संशोधनातून सिद्ध होत आहे. रुग्णाची श्वसननलिका खुली ठेवणे, त्यातील बेडके स्त्राव बाहेर काढणे व रुग्णाचे ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे हे फिजिओथेरपीस्टच्या कामाचे मुख्य स्वरूप आहे. मात्र जे व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले आहे, त्यामध्ये रुग्णाला खुर्चीत बसून छातीत आणि पाठीत मारले जात आहे. तर एका व्हिडीओमध्ये पेशंटला पोटावर झोपवून पाठीवर दोन्ही हाताने मसाज दिला जात आहे. ते अत्यंत्य चुकीचे असे आहे. या अशा चुकीच्या प्रकारामुळे रुग्णांना अधिक धोका संभवतो. अनेक वेळा  प्रसारमाध्यमातून आम्ही फिजिओथेरपीचा कोरोनाच्या रुग्णांमध्ये कसा उपयोग होतो हे वारंवार सांगितले आहे. मात्र अशा या व्हिडीयोमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे." 


ते पुढे असे सांगतात की, "फिजिओथेरपीचे उपचार नोंदणीकृत फिजिओथेरपिस्टकडून करून घ्यावेत कुणीही अशा चुकीच्या व्हिडीओवर अवलंबून उपचार घेऊ नयेत. अशा चुकीच्या पद्धतीने उपचार सुचवणारे ज्यांनी हे व्हिडीओ बनवले आहेत त्यांच्याविरोधात आम्ही कायदेशीर बाबी तपासून गुन्हा दाखल करणार आहोत. तरीही नागरिकांनी या अशा व्हिडीओवर विश्वास ठेवू नये.  काही व्हिडिओ असतील तर त्याची फिजिओथेरपिस्टकडून शहनिशा करून घ्या." 


प्रत्येक वैद्यकीय शाखा ही वेगळी असते, जो तो आपल्या शाखेत पारंगत असतो. त्यामुळे फिजिओथेरपिस्टच योग्य शास्त्रीय व्यायामाच्या सूचना व्यस्थित देऊ शकतो. चुकीच्या व्यायाम प्रक्रियेमुळे शाररिक त्रास होऊ शकतो. कोरोनाच्या या युद्धात मात देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्व प्रयत्न करीत आहे.  या सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त उपचार पद्धतीचा अवलंब करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.