मुंबई : जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याची माहिती समोर आली होती. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर मोठी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली होती. त्यानंतर काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत केल्याची माहिती दिली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


जळगावमधील वसतीगृहात महिलांचे कपडे काढून त्यांना नृत्य करायला लावलं अशी काही घडली नाही, असं अहवालात सिद्ध झालं आहे. वसतीगृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेथे काही महिला गरबा खेळत होत्या. जळगावमधील रत्नमाला सोनार हिने तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही, असं चौकशी समितीच्या अहवालात समोर आलं आहे. रत्नामाला ही वेडसर बाई आहे आणि हे पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे हे चौकशीच्या अहवालात आलं आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. वसतीगृहात एकही पोलीस अधिकारी वसतीगृहात गेल्याची रजिस्टमध्ये नोंद नाही. महिलांचा व्हिडीओ काढला गेला, अशीही कोणती माहिती अहवालात समोर आली नाही, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.


काय आहे प्रकरण?


जळगावच्या आशादीप वसतीगृहातील महिला आणि मुलींना काही कपडे काढून जणांनी डान्स करायला लावल्याची माहिती समोर आली होती. इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला आहे.


आशादीप वसतिगृह काय आहे?


जळगावातील ‘आशादीप महिला शासकीय वसतिगृह’ ही संस्था विधवा, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसेच कुमारी माता, मुली, अनाथ मुलं यांना आधार देते. त्यांच्या फक्त समस्या सोडवण्यापुरते हे मर्यादित नसून अनेक मुलींचे संसार याद्वारे थाटले गेले आहेत. 1983 मध्ये या वसतिगृहाची स्थापना शहरात करण्यात आली. तर 2006 पासून यास आश्रयगृह म्हणून घोषित करण्यात आले. आज येथील महिला व मुली स्वबळावर उभ्या राहण्याचे प्रशिक्षण घेत असून यात त्या यशस्वी झाल्या आहेत.


औरंगाबाद महिला अतिप्रसंगाचे पडसाद विधानसभेत,फडणवीसांकडून महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित