मुंबई: मुंब्रा बायपासचे काम सुरु असल्यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुलुंडचे दोन्ही टोललनाके, ऐरोली टोलनाक्यावर 21 आॉगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत खासगी हलक्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे हा निर्णय घेण्यात आला.


मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यात येणाऱ्या वाहनांना ऐरोली आणि मुलुंडहून फिरुन यावं लागतं. मात्र या रस्त्यावर दोन टोलनाके असून आधीच असलेली वाहतूक कोंडी आणि त्यात टोलसक्ती यामुळे वाहनचालक पुरते वैतागले होते.

शिळफाट्याकडून महापे, घणसोली, ऐरोलीमार्गे ठाण्यात येताना ऐरोली आणि मुलुंड असे दोन टोल वाहनचालकांना भरावे लागत आहेत. आधीच या संपूर्ण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यात पुन्हा टोल भरावा लागत असल्यानं वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप व्हायचा. ही टोलवसुली बंद करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यासाठी अनुकूल नव्हते.

ऐरोली, मुलुंड टोलनाक्यावरील वसुली बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मे महिन्यातच केली होती. इतकंच नाही तर त्यांनी स्वत: टोलवसुलीही बंद पाडली होती.

वाहतूक कोंडीने मनस्ताप

मुंब्रा बायपासचं काम सुरु झाल्यापासून वाहनचालक वाहनकोंडीने वैतागले आहेत. टोलनाक्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून लांबच लांब रांगा लागत आहेत. सायन-पनवेल हायवेवर खारघर टोलनाक्यावर मुंबईत येणाऱ्या वाहनांची कळंबोलीपासून म्हणजे साधारणपणे तीन किमी रांग लागते. हीच परिस्थिती मुलुंड आणि ऐरोली भागात आहे. त्यामुळे टोलवसुली बंद करण्याची मागणी होत होती.

तीन महिन्यांपासून मुंब्रा बायपास बंद

मुंब्रा बायपास या मार्गावरील वाहतूक मे महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या वाहतुकीचा ताण तीन महिन्यांपासून ऐरोली, शिळफाटा मार्गावर पडत आहे. उरणमधील जेएनपीटी बंदरातून नाशिक आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहनं मुंब्रा बायपास मार्गाचा वापर करतात, मात्र हा रस्ता धोकादायक झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील अवजड वाहतूक दुपार आणि रात्रीच्या वेळेस ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे ग्रामीण आणि पालघर भागातून वळवण्यात येते.

वाहतुकीत काय बदल?

घोडबंदर मार्गावर दुपारी 12 ते 4 या वेळेतही नियंत्रित पद्धतीने अवजड वाहतूक सुरु ठेवण्यात येते. भिवंडीतून जेएनपीटीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मुंब्रा बायपासमार्गे प्रवेश बंद. या मार्गावरील वाहतूक मानकोली, मुंबई-नाशिक महामार्ग, रांजनोली नाका, शहापूर, किन्हवली, सरळगाव, मुरबाड, कर्जत, चौकफाटामार्गे सोडण्यात येते. रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत भिवंडीतून मानकोली, मुंबई-नाशिक महामार्ग, रांजनोली नाका, येवई नाका, पाईपलाइन, सावद चौक, गंधारी पूल, आधारवाडी, दुर्गाडी सर्कल, पत्रीपूल, बदलापूर चौक, खोणी सर्कल, उसाटणे फाटा, तळोजा एमआयडीसीमार्गे, कळंबोली येथून प्रवेश.

संबंधित बातम्या 

आधीच वाहतूक कोंडी, त्यात टोलवसुली; वाहनचालक त्रस्त  

मुंब्रा बायपास रोडच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाला, वाहतुकीत बदल  

ठाणे: मुंब्रा बायपास दुरुस्तीच्या कामामुळे ट्रॅफिक जॅम  

मुंब्रा-बायपास 16 एप्रिलपासून दोन महिने बंद  

मुंब्रा बायपासचं काम सुरु, मात्र पर्यायी ऐरोली, शिळफाटा मार्गावर कोंडी