मुंबई : स्वप्ननगरी असेलेल्या मुंबईचे वैभव आता पर्यटकांना एकाच ठिकाणाहून पाहता येणार आहे. तब्बल 285 फुटांवरुन पर्यटकांना मुंबईचं वैभव अनुभवता येणार आहे. त्यासाठी मलबार हिलमधल्या हॅगिंग गार्डनशेजारी मुंबई महापालिकेकडून प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलीय.


या चार मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावरुन मुंबईकर आणि पर्यटकांना स्वप्ननगरी मुंबईचा नजारा पाहाता येणार आहे. नरीमन पॉईंटचा क्वीन्स नेकलेस, निळाशार समुद्र, गिरगाव चौपाटी आणि मुंबईचं इतर वैभव आता जवळून पाहता येणार आहे. या प्रेक्षक गॅलरीसाठी एकूण 11 कोटींचा खर्च येणार आहे. परदेशात जसा अनुभव घेता येतो तसाच अनुभव या गॅलरीतून आपल्याला मिळणार आहे.

प्रेक्षक गॅलरीत दुर्बीण आणि टेलिस्कोपही बसवले जाणार आहेत. या प्रेक्षक गॅलरीचे काम जवळपास पूर्ण झालं असून लवकरच याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यातून होणाऱ्या या मुंबईच्या प्रेक्षक गॅलरीला दिवंगत शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांचं नाव देण्यात येणार आहे.

प्रेक्षक गॅलरीतून दिसणारी ठिकाणं

  • गिरगाव चौपटी

  • अरबी समुद्र

  • नरीमन पॉईंटचा क्वीन्स नेकलेस

  • मुंबई उच्च न्यायालय

  • मुंबई विद्यापीठ


प्रेक्षक गॅलरीची वैशिष्ट्ये

  • एकाच वेळी 50 प्रेक्षक गॅलरीत राहू शकतात

  • सुरक्षेसाठी खास काचेचे तावदान

  • प्रेक्षकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

  • प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्क्रीन

  • अपंग व्यक्तींसाठी लिफ्ट आणि रॅम्पची सोय