मुंबई : अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे दोघे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे मास्टरमाईंड असल्याचा संशय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) आहे. त्यामुळेच अमोल काळेची सखोल चौकशी करण्यासाठी त्याची कोठडी घेण्याची तयारी डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआय टीमने केली आहे.
इतकंच नव्हे, तर अमोल काळे आणि वीरेंद्र तावडेच्या आदेशावरुनच सचिन अंदुरे आणि शरद कळसकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयला आहे.
कशी झाली दाभोलकरांची हत्या?
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे शूटर आहेत, तर या हत्येचे अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे सूत्रधार आहेत, असा दावा सीबीआयने केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमोल काळेला गौरी लंकेश हत्या प्रकरणात बंगळुरु एसआयटीने अटक केली आहे.
“दाभोलकरांच्या हत्येसाठी अमोल काळेने अंदुरे आणि कळसकरला शस्त्र दिली आणि पुण्यात बाईकचं नियोजन केले. हत्येच्या 10 दिवस आधी परिसराची रेकी अमोल काळेनेच केली. कुठे सीसीटीव्ही आहे का, याची पाहणी केली. या सर्व कटामागे वीरेंद्र तावडेचं ब्रेन आहे.”, असे सीबीआयने सांगितले.
“दाभोलकरांच्या हत्येच्या एका दिवसापूर्वी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे औरंगाबादमधून पुण्याकडे निघाले. सकाळी पुण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांना दोन हत्यारं आणि बाईकची किल्ली देण्यात आली. ओंकारेश्वर पुलाजवळील मॉलसमोर बाईक पार्क करण्यात आली. त्याचवेळी 7 वाजून 10 मिनिटांनी नरेंद्र दाभोलकर ओंकारेश्वर पुलाजवळ पोहोचले. तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीकडून अंदुरे आणि कळसकरने दाभोलकर असल्याचे कन्फर्म केले आणि कळसकरने दोन राऊंड, अंदुरेने एक राऊंड फायर केले. त्यानंतर बाईक पुण्याच्या बाहेर जाऊन पार्क करुन, ते औरंगाबादला पळाले. संध्याकाळी 5 वाजता ते औरंगाबादला पोहोचले", अशी माहिती सीबीआयने दिली.
“गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमोल काळेनेच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना या हत्येच्या कटात सहभागी करुन घेतले. औरंगाबादजवळील जंगलात प्रशिक्षण देण्यात आले. गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेल्या अन्य एकाने अंदुरे आणि कळसकरला प्रशिक्षण दिले.” असेही सीबीआयच्या सूत्रांनी सांगिलते.
अमोल काळे, वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे अटकेत
गौरी लंकेश हत्या प्रकरणी अमोल काळे याला मे महिन्यात बंगळुरु एटीएसने अटक केली आहे, तर वीरेंद्र तावडे याला दाभोलकर हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे.
शरद कळसकर हा नालासोपारा स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या हाती लागला. त्यावेळी तपासातच कळसकरचा दाभोलकर हत्येशी संबंध असल्याचे लक्षात आले आणि अधिक चौकशीनंतर त्याचा दाभोलकर हत्येशी थेट संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यानंतर कळसकरच्या चौकशीत सचिन अंदुरेचे नाव समोर आले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मित्र आहेत.
अमोल काळे कोण आहे?
अमोल काळे हा 48 वर्षीय असून, तो पुण्याच्या माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझातील रहिवासी आहे. पत्नी जागृती, पाच वर्षांचा मुलगा, म्हातारी आई यांच्याबरोबर पुण्यातील घरी अमोल राहत असे. वडिलांचं पानाची दुकान होतं, काही महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. अमोल काळेचं डिप्लोमापर्यंतचं शिक्षण झालं असून, स्पेअर पार्टस पुरवण्याचा धंदा करत होता. कधी कधी धार्मिक पुस्तकांची विक्रीही अमोल काळे करायचा.
कोण आहे वीरेंद्र तावडे?
वीरेंद्र तावडे हा पेशाने डॉक्टर असून, काना, नाक आणि घशाचा तज्ञ आहे. पनवेलमधल्या सनातनच्या आश्रमात तीन वर्षांपासून साधकांची आरोग्यसेवा करतो. 15 वर्षांपासून सनातनचा साधक आहे.
सचिन अंदुरे कोण आहे?
सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता. निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.
शरद कळसकर कोण आहे?
शरद कळसकर मूळचा औरंगाबादमधील केसापुरीचा रहिवासी आहे. औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरात लेथ मशीनवर काम करत असल्याचं घरी शरदने सांगितले होते. वडिलांकडे सहा एकर शेती आहे. शरदला पुणे, सोलापूर, सातारा, नालासोपाऱ्यात घातपाताच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याची कबुलीही शरदने दिली आहे.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण
20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर हत्या करण्यात आली. डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना, मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. आज (20 ऑगस्ट 2018) डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2018 12:14 PM (IST)
अमोल काळे आणि वीरेंद्र तावडेच्या आदेशावरुनच सचिन अंदुरे आणि शरद कळसकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -