मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं गुणगान गाणाऱ्या वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका शनिवारी मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढली. या वेबसाईटवर कारवाई करण्याची गरज नाही, अशी भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली.


गुणगान गाणाऱ्या वेबसाईटवर लिहिलेली माहाती ही अनेक दशकांपूर्वी एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचं इंग्रजी भाषांतर होतं. या संकेतस्थळावर नव्यानं कोणतीही माहीत लिहीली गेली नव्हती. त्यामुळे या वेबसाईटवर कोणत्याही कारवाईची गरज नाही. तेव्हा ही याचिका निकाली काढण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी हायकोर्टाकडे केली.

त्यानुसार, न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढत याचिकाकर्त्यांना पोलिसांत जाऊन तक्रार करण्याची मुभा दिलीय. यासंदर्भात वारंवार मुंबई आणि पुणे पोलिसांना तक्रार देऊनही त्याची योग्य दखल न घेतल्यानं केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली होती.

15 नोव्हेंबर 2015 ला नाना गोडसे यांनी एक संकेतस्थळ सुरू करत त्यावर नथुराम गोडसेचं गुणगान गाण्यास सुरूवात केली. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेनं गोळ्या झाडून गांधीजींची हत्या का केली? याचं सविस्तर स्पष्टीकरण या संकेतस्थळावर देण्यात आलंय. त्यामुळे हा देशद्रोहाचा प्रकार असून संबंधितांवर भारताविरोधात युद्ध पुकारल्याबद्दल गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.