मुंबई :  आपण विविध शहरांमध्ये वेगवेगळे झोन नेहमीच पाहात असतो. यात नो पार्किंग झोन, नो हॉकिंग झोन अशा झोनबद्दल आपण ऐकून असालच. मुंबईतही ठिकठिकाणी असे झोन आपल्याला पाहायला मिळतील. मात्र आता मुंबईत एका नव्या झोनची चर्चा सुरु आहे. हा झोन आहे नो किसिंग झोन. मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे असलेल्या जॉगर्स पार्कजवळ हा झोन नागरिकांनीच घोषित केला आहे. 

त्याचं झालं असं की, बोरिवली पश्चिम येथे असलेल्या जॉगर्स पार्कजवळ तरुण जोडपी भर रस्त्यात अश्लील कृत्य करत आहेत. यामुळे या विभागात राहणारे नागरिक त्रस्त झाले असून अश्या जोडप्यांना पायबंद घालण्यासाठी रस्त्यावरच नो किसिंग झोन अस लिहिलं आहे. बोरिवलीच्या चिकुवाडीतील सत्यम शिवम सुंदरम सोसायटी आहे. याच सोसायटीजवळ जोगर्स पार्क आहे.

या ठिकाणी नागरिक व्यायाम करायला तसेच फिरण्यासाठी जात असतात. कोविड काळात  अनेक ठिकाणी मनाई हुकूम असल्यामुळे या ठिकाणी तरुण जोडपी दुचाकी किंवा कारमध्ये येऊन अश्लील चाळे करत असतात. हे एक हाय प्रोफाईल क्षेत्र आहे आणि या हाय प्रोफाईल क्षेत्राच्या मध्यभागी एक गार्डन तयार करण्यात आलं आहे. या ठिकाणी जोडपी अश्लील कृत्य करताना नेहमीच दिसून येतात. अशा जोडप्यांना पायबंद घालण्यासाठी रहिवाश्यांनी  नवा मार्ग स्वीकारला आणि सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यावर NO KISSING ZONE असं लिहिलं आहे.  

विशेष म्हणजे नागरिकांकडून असं लिहिल्याचा परिणाम देखील झाला आहे.  याचा परिणाम म्हणून आता मात्र या ठिकाणी कमी जोडपी दिसत आहेत असं येथील रहिवासी सांगत आहेत.