मुंबईः महिलांनी शनिशिंगणापूर आणि महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळवला खरा मात्र मुंबईतील अंधेरीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी महिलांवर बंधन घालण्यात आली आहेत. मंडळाकून महिलांना जीन्स, स्कर्ट परिधान करून बाप्पाचं दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे श्रद्धेचा पोशाखाशी काय संबंध, असा प्रश्न भाविक विचारत आहेत.
असा आहे मंडळाचा अजब फतवा
अंधेरीच्या राजाच्या कमानीबाहेर जीन्स आणि स्कर्ट घालून येणाऱ्या महिला, मुलींना बंदी असल्याचा बोर्डच लावला आहे. हा बोर्ड सध्या मुंबईत चर्चेचा विषय बनलाय. कारण इथं बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर महिलांनी जीन्स, शॉर्ट स्कर्ट आणि तत्सम पोशाख करुन चालणार नाही. तर किमान सलवार कमीज, साडी अशा वेशातच बाप्पासमोर यावं लागणार आहे.
या फतव्याला काही भाविकांनी विरोधही करुन पाहिला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. माणसं मंदिरात किंवा देवदेवतांच्या दर्शनाला श्रद्धेपोटी जातात. त्यामुळे देवालाही भक्तांच्या सच्चेपणाशीच मतलब आहे.
कारण पुराणातही तुम्ही कुठले विशेष कपडे घालूनच आराधना केली पाहिजे, असंही लिहिलेलं नाही. मग तरीही महिलांच्या कपड्यांशी संस्कृती आणि नैतिकता चिटकवण्याचा अगोचरपणा का करायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विरोधाची धार मावळल्यानंतर भक्तांनीही राजीखुशीने अंधेरीच्या राजाच्या मंडळाचा फतवा अलिखितपणे मान्य केला आहे. एरवी व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भारंभार बोलणारेही गणपतीच्या दिवसात आपल्या संस्कृतीविषयी बोलू लागले आहेत. त्यामुळे थ्रीजी आणि फोरजीच्या जमान्यात बाप्पानेच माणसाला सद्बुद्धी द्यावी ही सदिच्छा.