मुंबई: गोव्यामध्ये संघात पडलेल्या फुटीचा फायदा घेण्यासाठी शिवसेना चांगलीच सरसावली आहे. आगामी गोवा विधानसभेत शिवसेना २० जागा लढवेल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

 

भाषेच्या मुद्दावर समविचारी पक्ष एकत्र आल्यास गोव्यात परिवर्तन शक्य असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणुकीसाठी संघातून बाहेर पडलेले वेलिंगकर आणि इतर समविचारी पक्षांनी सोबत येण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.

 

दरम्यान, मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुभाष वेलिंगकरांना गोव्याच्या नवनिर्वाचित संघ प्रमुखांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा अडचणीत आल्याची चिन्हं आहेत.

 

गोव्यातील शालेय अभ्याक्रम कोणत्या भाषेतून असावा, यासंदर्भातला प्रश्न मनोहर पर्रिकरांना नीटपणे हाताळता आला नाही, असं गोवा संघप्रमुख लक्ष्मण बेहरे यांनी म्हटलं आहे.

 

गोव्यातल्या शाळांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जाईल, असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गोव्याचे माजी संघ प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केला. त्यानंतर पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं संघानं वेलिंगकर यांचा राजीनामा घेतला. मात्र, या कारवाईमुळे संघाच्याच अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून संघाचे राजीनामे दिले.