मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपच्या युतीच्या चर्चेला ब्रेक लागल्याची चिन्ह आहेत. गेल्या आठ दिवसांपासून युतीची कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत भाजपला प्रतिसाद देणं बंद केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.


शिवसेना आणि भाजपची युती टिकवण्यासाठी मधल्या काळात प्रयत्न सुरु झाले होते. भाजपचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चाही सुरु केली. मात्र ही चर्चा निष्कर्षापर्यंत पोहचलीच नाही.


भाजपने 2014 मध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अचानक युती तोडली होती. त्याचा वचपा आता शिवसेना ऐनवेळी काढेल अशी शक्यता भाजपाला वाटत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची बदललेली देहबोली लक्षात येत असल्यामुळे भाजप आता काहीशा सावध पावित्र्यात आहे.


भाजपकडून आगामी निवडणुकीत युती व्हावी अशी इच्छा भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून शिवसेनेकडून युतीबाबत कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचं चित्र आहे. गेल्या 4 महिन्यांपासून शिवसेनेने सुरु केलेल्या सभा, दौऱ्यांमुळे त्यांना भाजपची गरज नाही असंच दिसून येत आहे.


भाजपाशिवाय आम्ही लढू शकतो आणि जिंकू शकतो अशी भाषा शिवसेनेच्या नेत्यांकडून होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींविरोधातील आक्रमकतेला वाढती धार हे सर्वात महत्वाचं कारण आहे. जागावाटपात किमान निम्मा वाटा या शिवसेनेच्या मागण्याही भाजपला मान्य नाहीत.


संबंधित बातम्या


जागावाटपाची बोलणी होईपर्यंत शिवसेनेविरोधात बोलू नका, भाजप पक्षश्रेष्ठींचे आदेश


जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा : उद्धव ठाकरेंचं सरकारवर शरसंधान


2019 लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युती, अमित शाहांना खात्री


आगामी निवडणुकीत सेना-भाजपची युती होईल : मुख्यमंत्री