मुंबई : सेवानिवृत्त पोलिसाला इतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांसह घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील वरळी भागात असलेल्या पोलीस कॅम्प वसाहतीत ही घटना घडली आहे.

सुरेश करकटे हे कर्मचारी 35 वर्ष पोलीस सेवेत काम केल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. करकटे गेल्या तीस वर्षांपासून वरळी पोलीस कॅम्पमध्ये कुटुंबासोबत राहतात. करकटेंसोबत इतर 55 पोलीस कर्मचारीदेखील निवृत झाले आहेत. निवृत्तीनंतर या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ते राहत असलेली घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले.

घर खाली करण्याचे आदेश मिळाल्यानंतर करकटे यांनी त्यांच्यासह 55 सेवा निवृत्त पोलिसांना घर खाली करण्यास मार्च 2019 पर्यंतची मुदत मागितली होती. त्यासंबधीचे पत्र करकटे यांनी प्रशासनाला दिले होते. तरिदेखील शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास काही पोलिसांनी करकटे यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत घरामध्ये डांबून ठेवले. त्यांच्या घराला बाहेरुन कुलुप लावण्यात आले होते.

याबाबत सांगताना करकटे म्हणाले की, सेवानिवृत्त होऊनदेखील त्वरीत घर खाली न केल्यामुळेच मला व माझ्या कुटुंबियांना घरामध्ये डांबून ठेवण्यात आले होते. हे सांगताना करकटे यांना अश्रू अनावर झाले होते.