मुंबई : परराज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना परत आणणार असल्याचं यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे. मात्र यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्र सरकारला अद्याप अधिकृतरित्या कळवलं नसल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात असलेल्या मजुरांना नेण्यासाठी किती बसेस आणि कुठे येणार याबाबत अधिकृत्यरित्या सरकारसोबत चर्चा झालेली नाही किंवा सरकारला कळवलेलं नाही, असं समजतं.


योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात राजस्थानातील कोटा इथे अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांना खास बसची सोय करुन आपापल्या घरी परत आणलं. त्यानंतर इतर राज्यात अडकलेल्या मजुरांनांही परत आणणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


परराज्यात 14 दिवसांचं क्वॉरंटाईन पूर्ण केलेल्या यूपीच्या मजुरांना परत आणणार : योगी आदित्यनाथ  


राजस्थान सरकारशी चर्चा, मात्र यूपी सरकारसोबत अजून चर्चा नाही!
दुसरीकडे कोटामध्ये अडकलेल्या दीड ते दोन हजार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. परंतु यूपीतील मजुरांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात अद्याप चर्चा झालेली नाही.


कोटामध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा हिरवा कंदील


अशोक गहलोत यांच्यासोबतच्या चर्चेसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्वीट
"मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन्ही राज्यांनी केलेल्या उपाय योजना आणि इतर अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी राजस्थानमधील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तिथे मिळणाऱ्या सोयी-सुविधांवर चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी दोन्ही राज्यांनी एकत्रितपणे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे," अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीटद्वारे दिली आहे.




 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला कोणतं आवाहन केलं होतं?
महाराष्ट्रात त्यातही मुंबईत यूपीचे स्थलांतरीत मोठ्या संख्येने आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्राने राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडाव्यात असं आवाहन केलं होतं. मात्र, या  मागणीनुसार आता विशेष ट्रेन सोडणं शक्य नसल्याचं केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लॉकडाऊननंतर परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्यात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच आपल्या राज्याच्या पण अन्य राज्यात असेलल्या स्थलांतरीत मजुरांना स्वतःच्या राज्यात आणण्याचं सूतोवाच केल्याने वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.


पंतप्रधानांसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी म्हणजेच 27 एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यावेळी याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि नागरिक इतर राज्यात अडकली आहेत. त्यामुळे पंतप्रधानांसोबतच्या व्हिसीमध्ये काय निर्णय होतो, ते कोणती भूमिका घेतात यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.


Yogi Adityanath | परराज्यात क्वॉरंटाईन पूर्ण केलेल्या मजुरांना परत आणणार -मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ