मुंबई : लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका अशी वारंवार विनंती करुनही शेकडो नागरिकांचे चोरून भटकणे थांबलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे 16 ड्रोन कॅमेरे शहरावर भिरभिरत आहेत. या कॅमेऱ्यात जर तुम्ही दिसलात तर तुमचा फोटो निघणार असून तो जवळच्या पोलीस स्टेशनच्या सिस्टमला अपलोड होणार आहे. त्यानंतर तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन तातडीने तुमची रवानगी पोलीस कोठडीत होणार आहे.
मॉर्निंग वॉक करणार्यांच्या विरोधात नवी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई सुरू केल्यानंतर अनेकांनी आता चोरून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचे लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी शेकडो नागरिकांची भटकंती सुरू आहे. बरेच नागरिक विनाकारण इमारतीच्या टेरेसवर येऊन घोळक्याने गप्पा मारत आहेत. काहींचा खाडीतील बोटीमध्ये पत्त्यांचा डाव रंगत आहे. लॉकडाऊनचे नियम तोडून दुसऱ्यांच्या आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या बेजबाबदार नागरिकांवर करडी नजर ठेवण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, उपायुक्त शिवराज पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गिरीश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 16 ड्रोन कॅमेरा शहरात तैनात केले आहेत. या कॅमेराच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर नजर ठेवली जात आहे. पनवेलमध्ये खाडीकिनारी याच कॅमेऱ्यामध्ये दिसलेल्या दहा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर ज्या सोसायटीच्या टेरेसवर नागरिक घोळक्याने गप्पा मारत होते त्या सर्व सोसायट्यांना नोटिसा पाठविण्यात आले आहेत.
सहा महिन्यांची शिक्षा होणार
कोरना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लोकांमध्ये बाहेर पडणे हा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यात संबंधित नागरिकांना सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घरातच थांबावे असे आवाहन पोलिसांनी केली आहे.
संबंधित बातम्या :