मुंबई:  जे पक्ष अनेक वर्ष विरोधात असतात आणि ते जेव्हा सत्तेत जातात, तेव्हाही ते विरोधकांसारखेच वागतात, असं म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेला टोला लगाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आज मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी गडकरी बोलत होते.

"जे पक्ष अनेक वर्षे विरोधात असतात आणि ते जेव्हा सत्तेत जातात, तेव्हा ते विरोधकांसारखेच वागतात. नाही नाही मी रावतेसाहेबांकडे बघून बोलत नाही. मी आमच्या भाजपबद्दलही बोलतोय. आम्ही अनेक आंदोलनं, पोलीस केसेस केल्या. त्यामुळे आमच्यापैकी अनेकांना सत्ता रुचत नाही." असा टोमणा गडकरींनी शिवसेनेला लगावला.

याशिवाय गडकरी म्हणाले, “दिलीप वळसे पाटील यांच्यावर  शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाया दिसते. कठीण परिस्थितीतही दिलीप वळसे पाटील यांनी साथ सोडली नाही. एक काळ होता ज्यावेळी 60 आमदार पक्षाची साथ सोडून गेले होते. त्यावेळी एकटे दिलीप वळसे पाटील पवारांसोबत राहिले. दिलीप वळसे पाटील यांनी नेहमी निष्ठा जपली. सध्या ज्यांचं राज्य येईल त्यांच्यासोबत जाण्याचं स्पर्धा वाढली आहे. मात्र दिलीप वळसे पाटलांना विचारबाबतची कटीबद्धता ठेवली. त्यांनी निष्ठेने पवारांना साथ दिली. वळसे पाटलांनी विरोधात असताना संयम सोडला नाही आणि सत्तेत असताना अहंकार केला नाही”.

दिलीप वळसे पाटलांना सुरुवातीपासूनच पवारसाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याअनुभवातून दिलीप वळसे पाटील संपन्न नेतृत्व म्हणून उदयास आले, असंही गडकरींनी नमूद केलं.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,  काँग्रेस खासदार अशोक चव्हाण, शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

पाहा व्हिडीओ