मुंबई : 'कुणीही महाराष्ट्र तोडण्याची भाषा करु नये, ही भाषा करणाऱ्या मुठभर लोकांना गुंडाळायला आम्हाला 24 तासही लागणार नाहीत, अशी भाषा करणाऱ्या श्रीहरी अणेंना महाराष्ट्रात ठेवायचं की नाही याचाही आम्हाला विचार करावा लागेल', असा इशारा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजप आणि संघ असल्याचा आरोपही त्यांनी केला.


 
'आज आपण कुणामुळे इथे आहोत, हे नव्या पिढीला समजायला हवे. आज जो तो सोशल मीडियाच्या मागे आहे, पण आपल्याला संयुक्त महाराष्ट्र कसा मिळाला हे त्यांनी जाणायला हवं. सध्याचा तरुण हा आगीसारखा आहे. आग ही चूलही पेटवते आणि तीच आग घरही पेटवू शकते. त्यामुळे तरुणांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. जेव्हा कुणी महाराष्ट्र तोडण्याची भाषा करेल तेव्हा आजची पिढी स्वतःहून या लढ्यात उतरायला हवी. अणेंसारखे वळवळणारे महाराष्ट्र तोडण्याची भाषा करुन 106 हुतात्म्यांचा अपमान करत आहेत. तेव्हा त्यांची जीभ कापायची की सत्कार करायचा हे तुम्हीच सांगा.' असंही नितेश राणे म्हणाले.

 
'अणे आपला वकिली पेशा मुंबईतच करीत आहेत. मुंबईवर त्यांचे पोट भरतेय. त्यामुळे त्यांनी आपली वकिली सोडून इतर कामं करु नयेत. अणेंना जी भाषा कळत असेल त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ. जर त्यांनी हिंसेची भाषा केली तर त्यांना त्याच भाषेत ठोकू', असाही इशारा त्यांनी दिला. अणेंचा बोलविता धनी भाजप आणि आरएसएसच आहे. त्यामुळेच अणेंवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप राणे नितेश राणेंनी केला.

 

 

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 106 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेने प्रथमच कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच हुतात्म्यांच्या कुटूंबियांचा प्रातिनाधिक सत्कार करण्यात आला.