मुंबई : मुंबईच्या माटुंग्यातील मिठाईच्या दुकानामधल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री पोलिसांनी दारुच्या नशेत दुकानात घुसून 7 कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे.


 
क्षुल्लक कारणावरुन शाब्दिक वाद

शाहू नगर पोलिस ठाण्याचे काही पोलिस कर्मचारी मध्यरात्री एकच्या सुमारास माटुंग्यातील प्रसिद्ध संदेश मिठाईच्या दुकानात घुसले. काम आटपून गप्पा मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित पोलिसांनी बेरात्री दंगामस्ती करत असल्याच्या कारणाने तंबी दिली. पोलिस आणि कर्मचाऱ्यांतील शाब्दिक वादाचं रुपांतर मारहाणीत झालं.

 
यापैकी एक पोलिस कर्मचारी गणवेशात होता, तर दोघे जण साध्या वेशात असल्याची माहिती पीडित कर्मचाऱ्यांनी दिली आहे. इतकंच नव्हे तर पोलिस दारुच्या नशेत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

 
आपण गुन्हा केला असेल तर पोलिस ठाण्यात घेऊन जावं, मारु नये अशी विनवणी कर्मचाऱ्यांनी अनेकदा करुनही पोलिस अमानुषपणे मारतच राहिले, असं दुकान मालक अजित सिंह यांनी सांगितलं.

 
दरम्यान जनतेचे संरक्षकच भक्षक बनत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.